Breaking News

लाचखोर अभियंत्यांकडे सापडले साडेबावीस लाखांचे घबाड

नाशिक, दि. 17, ऑक्टोबर - लाचलुचपत विभागाने कारवाई केलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तिन्ही लाचखोर अभियंत्यांकडे 22 लाख छत्तीस हजार 110 रुपयांचे घबाड  सापडले आहे. लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईनंतर या अभियंत्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी घरांची झडती घेतली असता यात सोने, चांदीची भांडी यासह रोख रक्कम  मिळून आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सार्वजनिक बांधकाम विभागाचे तीन अभियंते तीन लाखांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले होते.  त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. नाशिक येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र सखाराम पवार (वय-34) यांच्याकडे रोख रक्कम 1  लाख 75 हजार पाचशे रुपये, 6 लाख 45 हजार 194 रुपयांचे सोने, सहाय्यक अभियंता सचिन प्रतापराव पाटील (वय- 42) यांच्याकडे 1 लाख 6 हजार 450 रुपये रोख रक्कम,  05 लाख 1 हजार किंमतीचे 17 तोळे सोने. व शाखा अभियंता अजय शरद देशपांडे (वय 45) यांच्याकडे 1 लाख 93 हजार 766 रुपये किंमतीचे चांदीची 4726 ग्राम भांडी, 6  लाख 14 हजार 200 रुपये रोख रक्कम असा एकूण साडेबावीस लाखांचा मुद्देमाल मिळून आला आहे.