Breaking News

फटाक्यांच्या परिणामांबाबत महापालिकेच्या पर्यावरण खात्याचे अभ्यासात्मक संकलन

मुंबई, दि. 17, ऑक्टोबर - दिवाळी हा खरं तर प्रकाशाचा आणि आनंदाचा सण, पण गेल्या काही वर्षात या सणाचं नातं प्रकाशापेक्षा फटाक्यांच्या आवाजाशी जोडलं गेलंय! काही  क्षणात विरुन जाणार्‍या फटाक्यांच्या आवाजामुळे काही जणांना क्षणिक आनंद मिळत असेलही पण या फटाक्यांच्या आवाजामुळे आणि धुरामुळे होणारे दुष्परिणाम अनेकांना आयुष्यभर  सहन करावे लागतात. फटाक्यांमुळे ध्वनीप्रदुषण आणि वायुप्रदुषण होते, हे तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. पण यासोबतच हे फटाके आपल्यावर अनेक अंगांनी आणि  वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम करत असतात. महापालिकेच्या पर्यावरण खात्याने महापालिकेच्या रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने फटाक्यांमुळे होणार्‍या प्रतिकूल परिणामांचे  अभ्यासात्मक संकलन तयार केले. यात फटाक्यांमुळे शरीरावर होणारे परिणाम, फटाक्यांचे दुष्परिणाम, फटाके वाजवताना घ्यावयाची काळजी नमूद करण्यात आली  आहे.फटाक्यांबद्दल थोडेसे
फटाक्यांमध्ये अनेक घातक आणि प्रदुषणकारी द्रव्ये / रसायने असतात, ज्यामुळे जमीन, हवा आणि पाणी यावर विपरीत परिणाम होतो. फटाक्यांचा सर्वात घातक परिणाम हा लहान  मुलांवर आणि ज्येष्ठ नागरिकांवर होतो. जगातील काही देशांमध्ये फटाक्यांवर संपूर्णत: किंवा आंशिक स्वरुपाची बंदी आहे. तर काही देशांमध्ये विशिष्ट प्रकारच्या (उदा. रॉकेट)  फटाक्यांवर पूर्ण बंदी आहे. भारतामध्ये 125 डेसिबलपेक्षा अधिक आवाज असणार्‍या फटाक्यांवर बंदी आहे. घोषित शांतता क्षेत्राच्या 100 मीटरच्या परिसरात आवाज करणारे फटाके  फोडण्यावर बंदी आहे. रात्री 10 ते सकाळी 6 या कालावधीत फटाके फ़ोडण्यावर बंदी आहे. फटाक्यांमुळे होणार्‍या अपघातांचे / आगी लागण्याचे प्रमाण दिवाळीत सर्वाधिक असते.
’सेंटर फॉर सायन्स एण्ड एन्व्हायर्नमेंट’ यांच्या एका अभ्यास अहवालानुसार दिवाळी दरम्यान वायू प्रदूषणाचे प्रमाण हे सात ते आठ पटीने वाढल्याचे दिसून आले. या प्रकारच्या  प्रदूषणाचा प्रतिकूल परिणाम माणसाच्या आरोग्यावर होतो. तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, श्‍वसन विकाराचे रुग्ण, हृदयरुग्ण आदींवर या प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम होतो.  ’पर्यावरण संरक्षण कायदा 1986’ आणि हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, 1981’ मध्ये असणार्‍या विविध तरतुदींनुसार फटाक्यांच्या खोक्यावर फटाक्यातील घटक- रसायनांची माहिती, फटाके फोडताना होणार्‍या आवाजाची पातळी आदी माहिती छापणे बंधनकारक आहे.
फटाके फोडताना घ्यावयाची काळजी
शक्यतो फटाके फोडणे टाळावे. फटाके फोडावयाचेच झाल्यास आवाज न करणारे फटाके फोडावेत. फटाके फोडताना शेजारी पाण्याने भरलेली बादली ठेवावी किंवा लगेच पाण्याचा  पुरवठा होऊ शकेल अशा नळाला जोडलेला पाईप ठेवावा. जेणेकरुन काही अपघात झाल्यास किंवा दुर्घटना घडल्यास तातडीने प्रथमोपचार स्वरुपात पाण्याचा वापर करता येऊ शके ल. फटाक्याला प्रज्ज्वलीत केल्यावर तातडीने दूर होणे आवश्यक आहे. फटाके हे शर्ट, पँट किंवा कपड्यांच्या खिशात कधीही ठेवू नयेत. फटाके काचेच्या किंवा धातूच्या भांड्यात  ठेवून फोडू नयेत. फटाके फोडून झाल्यावर फटाक्यांच्या अवशेषांवर पाणी टाकावे, जेणेकरुन त्यातील ठिणगी किंवा उरलेल्या विस्तवामुळे आग लागणार नाही. ज्या परिसरात आपण  फटाके फोडणार आहोत तो परिसर फटाके फोडण्यासाठी बंदी असलेले क्षेत्र नाही याची खातरजमा करुन घ्यावी.