Breaking News

मानवधन संस्थेतर्फे पाड्यावरील आदिवासींसमेवत दिवाळी साजरी

नाशिक, दि. 17, ऑक्टोबर - अठराविश्‍व दारिद्रयात जीवन जगणार्‍या दुर्गम आदिवासी भागातील कष्टकर्‍यांना दिवाळीनिमित्त फराळाचे विविध पदार्थ, नवीन कपडे, चपला, बूट यांसह  मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत करत मानवधन या संस्थेने यंदा बांधिलकीची दिवाळी साजरी केली. इगतपुरी येथील आदिवासी पाड्यांवर दिवाळीनिमित्त संस्थेतर्फे विविध सा हित्यांच्या मदतीतून आदिवासी बांधवांमध्ये आनंदचा गोडवा भरण्यात आला. नवीन कपडे व फराळाचा आस्वाद घेऊन आदिवासींनाही आनंदाने दिपोत्सवात रंग भरले.
पाथर्डी फाटा येथील मानवधन सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. आर्थिक परिस्थिती हालाखीची  असल्याने आदिवासींना दिवाळींचा आनंदही उपभोगता येत नाही. शहरातील नागरीकांप्रमाणेच आदिवासी बांधवांनाही दिवाळीचा गोडवा अनुभवता यावा या उद्देशाने संस्थेतर्फे  इगतपुरीतील आदिवासी दुर्गम पाड्यावर फराळाच्या पदार्थांचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी संस्थेच्या स्वयंसेवकांनी पाड्यावर स्वच्छता अभियानही राबविले. दिवाळीनिमित्त  पाड्यावरील गरजू व गरीब मुलांना नवीन कपडे वाटप करण्यात आले. ज्येष्ठांनाही कपडे वाटप करण्यात आले. महिलांनाही विविध वस्तू मदत म्हणून देण्यात आल्या. संस्थेचे अध्यक्ष  प्रकाश कोल्हे व सचिव ज्योती कोल्हे यांच्या पुढाकाराने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. मानवसेवा हीच खरी ईश्‍वर सेवा या हेतूने संस्थेतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबविले  जातात. फराळांचे पदार्थांबरोबरच विविध प्रकारची खेळणी व शैक्षणिक साहित्याचे वाटप झाले. मुलांना आकाशकंदिलाचे वाटप करून दीपोत्सवाचे महत्व पटवून देण्यात आले.