Breaking News

बदलाचे वारे मोदींच्या मुळावर....!

दि. 02, ऑस्टोबर - राजकारणात सदा सर्वकाळ कुणीही कुणाचा समर्थक अथवा विरोधक नसतो.निसर्गाचा परिवर्तनाचा नियम फारच संवेदनशील आणि शिथील  राहतो.हा अनुभव आहे.अलिकडच्या काळात दिसणारा दलबदलूपणा याचा दाखला देतो.एका  पक्षातून दुसर्या पक्षात जाऊन राञीत भुमिका बदलणार्या नेत्यांची  मानसिकता एकवेळ ग्राह्य धरता येईल पण एकाच पक्षात राहून वारंवार भुमिका बदलणारे,स्वपक्षिय नेत्यांवर टिकेची झोड उठविणारे पदाधिकारी लोकप्रतिनिधी इतकेच  नाही,तर आशीर्वाद देणार्या बुजूर्गांच्या भुमिकेत असलेले महानुभव सरकारमध्ये पक्षाचे नेतृत्व अपयशी ठरल्याची भाषा बोलू लागतात तेंव्हा बदलाचे वारे वाहू लागल्याचे  निश्‍चित संकेत मिळू लागतात.या वार्याची दिशा फक्त तेव्हढी समजून घेण्याचे कौशल्य हवे.
सध्या इतर राजकीय पक्षांच्या बाबतीत परिवर्तनाचा हा मुद्दा तसा गौण आहे.या पक्षांकडे गमावण्यासारखे काही उरले नाही.राहता राहीला सत्ताधारी भाजपाचा प्रश्‍न.या  पक्षात नक्कीच बदलाचे वादळ घोंघावतांना दिसतय.भाजपातील काही धुरीण मंडळींची पावले कुठल्या दिशेने पडू लागलेत याचा अंदाज घेतल्या नंतर नजिकच्या  भविष्यात परिवर्तन अटळ दिसते.
भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांची बैठक आहे.संघ भाजपाचे मातृदैवत आहे.हे उघड गुपीत आहे.भाजपाच्या जन्मापासून(पुर्वीचा जनसंघ)  भाजपाच्या हवाली देशाची सुञे देई पर्यंत राजकीय वाटचालीत संघासह विश्‍व हिंदू परिषद,बजरंग दल,इतकेच नाही तर बहुचर्चित सनातनने आपआपला सहभाग  नोंदविला आहे.
भाजपाच्या जाहीरनाम्यापासून सत्तेत आल्यानंतर धोरण निश्‍चिती आणि अमलबजावणीत या मंडळींचा सहभाग नसतो असे समजणे पढत मुर्खाचे लक्षण मानावे लागेल.
हा दावा खरा असला तरी आज या पक्षात वाहू लागलेल्या बदलाच्या वार्यांना धोरण निश्‍चिती आणि अमलबजावणीत या मंडळींची होत असलेली उपेक्षा कारणीभूत  ठरत असल्याची चर्चा आहे.नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून प्रमोट करणारे आज मोदींच्या धोरणांवर आपली नाराजी उघडपणे जाहीर करीत असतांना पक्षाची  शिस्तभंग समिती एका शब्दानेही या मंडळींना जाब विचारत नाहीत यावरून पक्षाला बदल हवा आहे.अचानक बदल करून नकारात्मक संदेश देण्याऐवजी पक्षीय  पातळीवर वातावरण निर्मिती करण्याचे धोरण या भुमिकेमागे असावे अशी शंका घेण्यास पुरेसा वाव मिळतो.
यशवंत सिन्हा,नाना पटोले या मंडळींनी नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर जाहीरपणे केलेली टिका प्रसार माध्यमांमध्ये चघळली जात असतांना नागपूरच्या सिमोल्लंघनात  सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांचीच री ओढणे कुठला संकेत देते?यशवंत सिन्हांच्या दृष्टीने भारताची अर्थव्यवस्था उध्वस्त होण्यास मोदी सरकारचे धोरण  कारणीभूत ठरते.तर मोहन भागवत यांना देशाची आर्थिक गती मंदावल्याची जाणिव होते.दोन दिवसांच्या अंतराने या दोन महानुभवांनी मोदींच्या कार्यशैलीचे केलेले  परिक्षण निव्वळ योगायोग मानता येणार नाही.
एका बाजूला भाजपासाठी अंतिम निर्णय स्थान असलेल्या मातृसंस्थेचे मोहन भागवत मोदींच्या अर्थ धोरणाचे बाभाडे काढतात त्याचवेळी नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतले  मानले जाणारे मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस हे देखील मोदींंपासून अंतर ठेवण्यात हशील मानू लागल्याचे काही घटना सांगतात.मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे  गृहमंञीही आहेत.नारायण राणे यांच्या विरूध्द शिवसेनेचे अरविंद भोसले यांनी झळकावलेले पोस्टरवर कारवाई करण्याची तत्परता दाखवितात ,माञ ती शिवसेना  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिकात्मक याञा काढते त्यावर पोलीस कारवाई तर दुरच साधे भाष्यही करीत नाही.गृहमंञालयाचा कारभार सांभाळणार्या मुख्यमंञ्यांना ही  प्रतिकात्मक प्रेतयाञा रोखून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीसांना देणे सहज शक्य होते.माञ तसे झाले नाही.
या सर्व घडामोडी लक्षात घेता संघ परिवारातील सर्व मंडळींना नाकापेक्षा मोती जड होत असल्याची जाणिव होऊ लागल्याने बदलाची शस्रक्रीया यशस्वी होण्यासाठी  वातावरण निर्मिती सुरू झाल्याची शंका येणे स्वाभाविक आहे.