Breaking News

हमीद दलवाईंवरील माहितीपटासाठी नसिरुद्दीन शाह चिपळूणला येणार

रत्नागिरी, दि. 27, ऑक्टोबर - ज्येष्ठ साहित्यिक हमीद दलवाई यांच्या जीवनावर आधारित माहितीपट तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याच्या चित्रीकरणासाठी येत्या 3 आणि 4  नोव्हेंबरला ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह, दिग्दर्शक व अभिनेत्या अमृता सुभाष व ज्योती सुभाष चिपळूण येथे येणार आहेत. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार हुसेन दलवाई यांनी  याबाबतची माहिती पत्रकारांना दिली. 
मिरजोळी (ता. चिपळूण) हे दलवाईंचे जन्मगाव आहे. त्यांनी साहित्यामध्ये प्रभावी कामगिरी केली होती. इंधन ही त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीवर त्यांनी लिहिलेली कादंबरी विशेष  गाजली होती. त्यांच्यावर आधारित माहितीपट तयार करण्याचे काम ज्योती सुभाष यांनी हाती घेतले आहे. या माहितीपटात ज्येष्ठ अभिनेते नासिरुद्दीन शाह हमीद दलवाईंची भूमिका क रणार आहेत. दिग्दर्शक व अभिनेत्या अमृता सुभाष व ज्योती सुभाष त्यांना साथ देणार आहेत. हमीद दलवाई यांच्या मृत्यूनंतर त्यांचे कार्य अविरत सुरू ठेवण्यासाठी त्यांची पत्नी  मैहरुन्निसा यांनी ठिकठिकाणी कार्यक्रम घेतले. काही महिन्यांपूर्वी त्यांचेही पुण्यात निधन झाले. चिपळुणात हमीद दलवाई यांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी मिरजोळी येथे हमीद  दलवाई भवन उभारण्यात आले आहे. हमीद दलवाई फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यात ठिकठिकाणी विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून माहितीपट तयार क रण्याचे काम सुरू असल्याचे दलवाई यांनी सांगितले.