Breaking News

लोकपाल बाबतच्या मागण्या मान्य न झाल्यास डिसेम्बरपासून पुन्हा आंदोलन - अण्णा हजारे

नवी दिल्ली, दि. 03, ऑक्टोबर - मोदी सरकारने लोकपाल विधेयक कमजोर होईल असेच प्रयत्न केले . या विधेयकाबाबत मोदी सरकारने आमच्या मागण्या मान्य  केल्या नाहीत तर डिसेम्बरपासून नव्याने आंदोलन करू , अशी घोषणा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज येथे केली. अण्णा हजारे यांनी आज राजघाटावर  जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली . त्या नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अण्णांनी लोकपाल मुद्द्यावरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली . 
ते म्हणाले की , काँग्रेस आघाडी केंद्रात सत्तेत असताना लोकपाल विधेयक मंजूर करण्याची प्रक्रिया वेगाने पार पाडली गेली होती . हा कायदा अजूनही पूर्णपणे  अंमलात येऊ शकलेला नाही. मोदी सरकारने लोकपाल विधेयकात काही दुरुस्त्या करून या विधेयकाची परिणामकारकता कमी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप  अण्णांनी या वेळी केला.
लोकपाल विधेयकात सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना संपत्ती जाहीर करणे बंधनकारक केले गेले होते . मात्र मोदी सरकारने या तरतुदीत बदल केले,  असेही ते म्हणाले . ते म्हणाले की , सत्तेवर येण्यापूर्वी मोदी यांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्‍वासन दिले होते . मात्र अजूनही मोदी  सरकारला विदेशातील काळा पैसा भारतात आणण्यात यश आलेले नाही. नोटा रद्द निर्णयानंतरही काळा पैसा कमी झालेला नाही . लोकपाल विधेयकासंदर्भातील  मागण्या मोदी सरकारने मान्य न केल्यास आपल्याला डिसेंबरपासून नव्याने आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला . या आंदोलनात अरविंद केजरीवाल  यांना सहभागी करून घेतले जाणार नाही असे अण्णांनी स्पष्ट केले .