Breaking News

राणे आणि खोतांचे सीमोल्लंघन कोणाच्या फायद्याचे ?

मुंबई, दि. 03, ऑक्टोबर - नारायण राणे आणि सदाभाऊ खोत यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र संघटना राज्याच्या राजकारणात कोणासाठी फायदेशीर ठरतात याची  चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. नारायण राणे यांनी दसर्‍याच्या दुसर्‍या दिवशी महाराष्ट्र स्वाभिमान नामक पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली तर सदाभाऊ  खोत यांनी घटस्थापनेचा मुहूर्त निवडत रयत क्रांती या शेतकरी संघटनेची स्थापना केली. राणे यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळणार हे जवळपास नक्की आहे.  त्यांना कोणते खाते मिळणार याचीच उत्सुकता आहे. 
या दोघांना आपल्या कळपात ओढून मात्र त्याच वेळी त्यांना स्वतंत्र संघटना स्थापायला लावून भारतीय जनता पक्षाने खरे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  वेगळीच चाल खेळली आहे . खोत आणि राणे यांना थेट भारतीय जनता पक्षात का घेतले गेले नसावे या विषयी राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा चालू आहे. खोत  यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर काढण्यात आले . त्याच बरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचीही घोषणा  केली . या संघटनेचे सर्वेसर्वा असलेले खा . राजू शेट्टी हे गेल्या काही महिन्यापासून मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करत होते. खोत यांना भाजप नेतृत्वाकडून  दिले जात असलेले महत्व खा . शेट्टी यांनी खुपत होते. खा. शेट्टी यांनी आता राज्यभरातील शेतकरी संघटनांची मोट बांधायचे ठरवले आहे . याला शह देण्यासाठी  सदाभाऊ खोत यांचा वापर करून घेण्याचा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचा मानस असल्याचा अंदाज वर्तविला जातो आहे. छोट्या मोठ्या शेतकरी संघटनांच्या  नेत्यांना एकत्र आणण्यासाठी खोत याना नव्या शेतकरी संघटनेची स्थापना करण्यास सांगितले गेले आहे . यंदाच्या साखर हंगामात ऊसाला एफआरपी पेक्षा 300 रु.  अधिक भाव मिळाला पाहिजे अशी मागणी सदाभाऊंनी विजयादशमीला इचलकरंजी येथे घेतलेल्या मेळाव्यात केली. या पुढील काळात खा. राजू शेट्टी यांच्या  मतपेढीला सुरुंग लावण्याचे काम सदाभाऊ करतील असे मानले जात आहे.
नारायण राणे यांच्या माध्यमातून काँग्रेस आणि शिवसेनेला खिंडार पाडण्याच्या चाली खेळल्या जातील असे मानले जात आहे.राणे हे आपल्या बळावर काय करू  शकतात हे भाजप नेतृत्वाला आजमावायचे आहे. त्यासाठी त्यांना मंत्री करून आवश्यक ती ताकद दिली जाईल , असे मानले जात आहे.