Breaking News

मिरजेत अडीच लाखाचा गांजा जप्त

सांगली, दि. 27, ऑक्टोबर - मिरज तालुक्यातील मालगाव येथे मिरज ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून ऊसात लावलेला अडीच लाख रूपये किंमतीचा सुमारे 82 किलो गांजा जप्त  केला. याप्रकरणी मनोहर बोधा गावडे (वय 60, रा. मालगाव) या शेतक-याला अटक करण्यात आली आहे.
मालगाव- सिध्देवाडी रस्त्यावर माळी वस्तीनजीक जयपाल गावडे याच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती मिरज उपविभागीय पोलिस अधिकारी धीरज पाटील  यांना मिळाली होती. या माहितीआधारे धीरज पाटील व मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोहन जाधव यांच्यासह पोलिस पथकाने छापा टाकला. त्यावेळी शेतात अर्धा  एकर ऊसाच्या सरीत गांजाच्या रोपांची लागवड केल्याचे दिसून आले.
मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याकडील कर्मचारी बसवेश्‍वर शिरगुप्पे, दिलावर सय्यद, दिलीप पाटील व नौशाद शेख यांनी ही पूर्ण वाढ झालेली सहा ते साडे सहा फूट उंचीची 82 किलो  वजनाची 56 गांजाची झाडे जप्त केली. याप्रकरणी मनोहर गावडे याच्याविरोधात मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.