Breaking News

अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य करा - होन

अहमदनगर, दि. 02, ऑक्टोबर - बहुतांश अंगणवाडी सेविका व त्यांचे कुटुंब यांचा उदार्निर्वाह पूर्णपणे त्यांना मिळणा-या सेवेच्या मानधनातून चालतो. परंतु, मिळणारे मानधन अतिशय तुटपुंजे आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस सध्या करीत असलेले काम व त्याबदलात मिळणारे मानधन अतिशय कमी आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका शासनाकडे करीत असलेल्या मागण्या या रास्तच असून शासनाने या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन यांनी केली. 
महिला बालकल्याण विभागाला दिलेल्या पत्रात होन यांनी म्हटले आहे की, महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 2 लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. अंगणवाडी सेविकांना दरमहा रुपये 5 हजार, तर मदतनिसांना दरमहा अडीच हजार रुपये असे तुटपुंजे मानधन दिले जाते. सरकारने यासाठी मानधनवाढ समितीची स्थापना केली होती. या समितीने मानधन दुप्पट करण्याची शिफारस केली आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन समान करण्याचीही शिफारस केली आहे. याशिवाय सेविकांना देण्यात येणार्‍या मानधनाच्या 70 टक्के मानधन मदतनीसांना देण्याची शिफारस सरकारला केली आहे. या समितीच्या शिफारशीची महिला बाल कल्याण विभागाने दखल घ्यावी.
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनाच्या प्रश्‍नाबरोबरच त्यांना असलेल्या अडचणी यामध्ये ज्या अंगणवाडयांना स्वतंत्र इामारती नाहीत, किंवा धोकादायक असलेल्या इमारतींच्या जागेवर ताबडतोब नवीन इमारती बांधून मिळाव्यात. अंगणवाडी कर्मचार्‍यांना महिला व बालविकास खात्याच्या कामाव्यतिरिक्त शासनाच्या अन्य विभागाकडून कामे देण्यात आल्यास त्या संबंधित विभागाने अंगणवाडी सेविकांना मानधन प्रतिदिन 200  रूपये द्यावे व मदतनीसांना 50 रूपये द्यावे. अंगणवाडी सेविकांना दरमहा 5 तारखेला वेतन द्यावे. अंगणवाडी सेविकांना वैद्यकीय उपचार व वैद्यकीय रजाही देण्यात याव्या आदी होन केल्या आहेत.