Breaking News

रेशनिंगच्या मागणीसाठी पिंपरीत राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे, दि. 13, ऑक्टोबर - गोरगरीब नागरिकांचे रेशनिंग ऐन दिवाळीत बंद केल्याने त्यांना प्रपंच चालविणे अवघड झाले आहे. त्यामुळे गोरगरिबांना राशन देण्यात यावे, या  मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्यावतीने आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष  विनोद कांबळे, महिला विभाग अध्यक्ष गंगाताई धेंडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर मंगला कदम, प्रवक्ते फजल शेख, विजय  लोखंडे, आनंदा यादव, कविता खराडे, अरुणा कुंभार, पुष्पा शेळके, प्रमोद साळवे, पौर्णिमा पालेकर, संगीता जाधव आदी सहभागी झाले होते. 
यावेळी संजोग वाघेरे म्हणाले, अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना जे धान्य द्यायला हवे, त्याचा काळा बाजार होत आहे. प्रत्येक दुकानदाराचे दरमहा ऑडिट झाले पा हिजे. एपीएल केशरी कार्डधारकांना दिवाळीनिमित्त गहू, तांदूळ, साखर, तूरडाळ, गोडेतेल आणि रॉकेल मिळालेच पाहिजे. तसेच पिवळ्या रेशन कार्डसाठी उत्पन्न मर्यादा 18,000  ऐवजी 75,000 करावी, केशरी कार्ड धारकांची उत्पन्न मर्यादा 99000 रु. वरून 150000 करावी, आधार लिंक करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अन्न सुरक्षा योजनेचे फेर सर्वेक्षण  व्हावे, आदी मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.मंगला कदम म्हणाल्या की, एकीकडे गॅस दरवाढीने कंबरडे मोडले आहे. दुसरीकडे  रेशनवर, साखर, रॉकेल मिळत नाही. बायोमेट्रिक सारख्या बाबींमुळे रेशनिंग दुकानदारही अडचणीत आले आहेत.