Breaking News

पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना जाहीर

केळी, पेरू, डाळींब व मोसंबी फळपिकांसाठी अंतिम मुदत 31 ऑक्टोंबर 2017

बुलडाणा, दि. 01, ऑक्टोबर - सन 2017-18 साठी आंबिया बहार व गारपीटमध्ये पुर्नरचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना जाहीर करण्यात आली  आहे.  जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा,  मोसंबी, केळी, द्राक्ष, आंबा, पेरू, डाळींब व लिंबू या फळपिकांकरिता राबविण्यात येणार आहे. योजनेतंर्गत फळपिक निहाय  विमा संरक्षण रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे. ही योजना राज्यात 30 जिल्ह्यातील 287 तालुक्यांमधील 1507 महसूल मंडळात राबविण्यात येणार आहे.
ही योजना कर्जदार शेतकर्‍यांना सक्तीची असून बिगर कर्जदार शेतकर्‍यांना ऐच्छीक आहे. योजना 4 समूहांमध्ये राबविण्यात येणार आहे. समूह एक मध्ये इफको  टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, समूह दोन व तीमध्ये एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व समूह 4 मध्ये बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स  कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे. शेतकर्‍यांना विमा हप्ता दर संरक्षीत रक्कमेच्या पाच टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जी कमी असेल ती रक्कम शेतकर्‍यांनी  भरावयाची आहे. उर्वरित विमा हप्ता केंद्र व राज्य शासन समप्रमाणात अदा करणार आहे.
आंबिया बहारातील मोसंबी, केळी, पेरू, डाळींब या पाच फळपिकांसाठी शेतकर्‍यांनी विमा प्रस्ताव बँकांकडे 31 ऑक्टोंबर 2017 पर्यंत सादर करावयाचे आहे. तसेच  द्राक्ष फळपिकाकरीता 15 ऑक्टोंबर, लिंबूकरीता 14 नोव्हेंबर, आंबा फळपिकासाठी 31 डिसेंबर, तर संत्रा व काजू फळपिकाकरीता 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत  प्रस्ताव बँकांना सादर करावयाचे आहेत.
योजनेनुसा कमी /जास्त पाऊस, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारीत केलेल्या कालावधीत शेतकर्‍यांना विमा संरक्षण आणि  आर्थिक सहाय्य देण्यात येते.  शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त संख्येने या योजनेत सहभागी व्हावे. याबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि  सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, नजीकच्या बँक शाखेशी व संबंधीत विमा कंपनीशी संपर्क साधावा. शेतकर्‍यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता  जास्तीत जास्त प्रमाणात या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन  कृषि विभागाने केले  आहे.