Breaking News

संगणक परिचालकांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण

बुलडाणा, दि. 17, ऑक्टोबर - संगणक परिचालकांना शासकीय कर्मचार्याप्रमाणे सुविधा देण्यात याव्यात, टास्क कन्फर्मेशन ही जाचक अट रद्द करून शासन निर्णयाप्रमाणे सहा  हजार रुपये वेतन देण्यात यावे, संग्राम प्रकल्पामध्ये त्यांना सामावून घेण्यात यावे, महा ऑनलाइन कडील डिसेंबर 2015 पर्यतचे थकीत मानधन देण्यात यावे, यासह इतर  मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने 14 ऑक्टोबरपासून येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात जिल्हाभरातील  शेकडो संगणक परिचालक सहभागी झाले होते. संगणक परिचालाकाच्या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठींबा दिला आहे. 
शासनाने दिलेले प्रत्येक काम राज्यातील संगणक परिचालकांनी केले आहे. त्यामध्ये शेतकरी कर्जमाफी, पीकविमा योजना, गावातील नागरिकांना रहिवाशी,जन्म मृत्युचा दाखला,  पीटीआर उतारा, बांधकाम परवाना यासह 29 प्रकारचे दाखले देणे तसेच ग्रामपंचायतीचा सर्व जमा खर्च ऑनलाईन करण्यासह शौचालयाचे फोटो काढणे, घरकुलाचे फोटो काढणे,  निवडणूक विभागाचे कामे करणे, जनगणनेचे कामे करणे, निर्मल भारत अभियानाचे कामे करणे यासह अनेक कामे अनंत अडचणीचा सामना करून संगणक परिचालकांनी केले आहे.  संगणक परिचालकांच्या हातात तुटपुंजे मानधन महिन्याला मिळत आहे. त्यामुळे संगणक परिचालकावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे संगणक परिचालकामध्ये संताप व्यक्त  होत आहे. त्यामुळे सिएसी सिपिव्ही ने प्रिया सॉफ्टच्या नावाखाली कपात केलेले मानधन परत देण्यात यावे, नागरिकांना देण्यात येणार्या दागल्यामागे प्रोत्साहनपर साठ टक्के कमिशन  देण्यात यावे, महाऑनलाइन कडील डिसेंबर 2015 पर्यतचे थकीत मानधन देण्यात यावे, यासह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत.
या आंदोलनात निलेश खुपसे, बंडु देशमुख, विजय वाशिमकर, प्रविण पाटील, प्रवीण कंडारकर, सचिन झाल्टे, अनिल वाकोडे, सतिष ठोकरे, सचिन तरमळे, मंगला पाठक, जयश्री  शिंदे, शारदा सवळे, अर्चना शेळके, शुभांगी सावळे, वैशाली कोकाटे यांच्यासह संगणक परिचालक सहभागी झाले होते.