Breaking News

धुळे, नंदुरबारमध्ये एसटी कर्मचारी संपावर; प्रवाशी बेहाल

धुळे, दि. 18, ऑक्टोबर - एसटी महामंडळातील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, विविध भत्ते व सेवा सवलती देण्यात याव्यात याप्रमुख मागण्यासाठी महाराष्ट्र एसटी  कर्मचारी आयोग संयुक्त कृती समिती 16 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून संपावर गेल्याने खान्देशातील धुळे व नंदुरबार जिल्हयातील नऊ आगारातून एकही एसटी धावली नाही.
या संपामुळे प्रवाशांचे एन दिवाळीत हाल होऊ नये म्हणून शासनाकडून तात्काळ परिपत्रक काढून राज्यातील सर्व आगारामध्ये खाजगी बस, शालेय बस, कालीपिली टॅक्सींना  परवानगी देवून प्रवासी वाहतूक सुरु करण्यात आली होती. दरम्यान, आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यत संप सुरुच राहील असा इशारा यावेळी कर्मचा-यांनी दिला आहे.
यावेळी त्यांनी निदर्शने करीत एसटी कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतनश्रेणी दयावी, कामगारांना सुधारित वेतन करार होत नाही तोपर्यत कर्मचा-यांना  25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी आणि इतर राज्यांच्या तुलनेत एसटी कर्मचा-यांना वेतनात असलेली तफावत नवीन वेतन कायदयानुसार दुर करावी अशा मागण्या केल्या.
या राज्यव्यापी संपात महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, एसटी वर्कस काँग्रेस (इंटक) या दोन संघटनांसह सहा संघटना सहभागी झाल्या आहेत. सोमवारी मध्यरात्री बारा वाजेपासून  संपाला सुरुवात करण्यात आली होती. यामुळे एसटी सेवा ठप्प झाली आहे.
धुळे विभागात धुळे व नंदुरबार जिल्हयातील नऊ आगारातून दररोज सुमारे 4300 बसफे-या होतात. तर विभागात एकूण 780 बस आहेत. मात्र या संपामुळे त्या बसेस आगारातच  होत्या. त्यामुळे एन दिवाळी सणाच्या हंगामात धुळे विभागाचे अपेक्षित उत्पन्न 1 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या संपात जवळपास 3500 कर्मचारी सहभागी होते. धुळे  बसस्थानकावर सहभागी कर्मचा-यांनी आगाराच्या आवारातच दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती. मागण्या मान्य न होई पर्यत संप सुरुच राहील यावर ठाम असल्याचे चंद्रकांत  गोसीवी, रामेश्‍वर चत्रे, पोपट चौधरी, संतोष वाडीले यांच्यासह कर्मचा-यांनी माहिती दिली आहे.
एसटी कर्मचा-यांनी संप पुकारल्याने येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय लांडे, अमृत चव्हाण, पोलीस उपअधिक्षक श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे व पोलीस  कर्मचा-यांनी पुढाकार घेवून प्रवाशांना सेवा देण्यासाठी धुळे विभागातील आगारात खाजगी बस व इतर वाहनांची व्यवस्था केली होती.