Breaking News

सावळा-सुंदरखेड ग्रामपंचायत निवडणूकीत भारिप बहुजन महासंघाचा पुरस्कृत उमेदवार कोण?

बुलडाणा, दि. 01, ऑक्टोबर - ऑक्टोबर रोजी होवू घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत सावळा-सुंदरखेड ग्रामपंचायत बुलडाणा शहराला लागून असल्यामुळे या  ग्रामपंचायतीला अतिशय महत्व आहे. या ग्रामपंचायतीला कोट्यावधी रुपयांचा निधी मिळतो त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचा या ग्रामपंचायतीवर डोळा असून यंदाच्या   निवडणूकीत भारिप बहुजन महासंघाचा पुरस्कृत उमेदवार कोण? हा वाद चांगलाच चिघळलेला दिसून येत आहे. भारिप बहुजन महासंघाचा घाटावरील जिल्हाध्यक्ष  पदाचा तिढा कायम असून त्यात आता निवडणूकीचा वाद चांगलाच चिघळला आहे. दरम्यान सुंदरखेड येथील ज्ञानदिप विद्यालयाचे अध्यक्ष विष्णू उबाळे यांच्या पत्नी  सुनिता उबळे यांना बाळापूर विधानसभेचे आमदार बळीराम सिरसकर यांनी 28 सप्टेंबर रोजी स्वत:च्या लेटरपॅडवर सहिनीशी पत्र दिले असून त्या पत्रात त्यांनी  श्रद्धेय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये सावळा सुंदरखेड गट ग्रामपंचायतचे अधिकृत उमेदवार सुनिता विष्णू उबाळे व त्यांचे समर्थक उमेदवार  यांना पक्षाचे पूर्ण समर्थन व पक्षाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी सदर उमेदवारास निवडून आणण्यासाठी भारिपच्या सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आदेश दिले आहेत.  असे आमदार सिरसकर यांच्या सहीचे पत्र उबाळे यांच्याकडे आहे. असे असताना पक्ष निरीक्षक भिमराव तायडे यांनी सावळा सुंदरखेड ग्रामपंचायत निवडणूकीसाठी  स्वतंत्र पॅनल तयार करुन जिजाबाई साहेबराव रिंढे यांना सरपंचपदाचे पुरस्कृत उमेदवार घोषित केल्याने पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. तायडे यांनी 29  सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेवून आमदार बळीराम सिरसकर यांनी दिलेल्या उमेदवाराला नाकारुन जिजाबाई साहेबराव रिंढे याच भारिपच्या अधिकृत उमेदवार  असून त्यांनाच निवडून आणण्याचे आवाहन केले आहे. शिवाय बुलडाणा जिल्ह्याचा पक्ष निरीक्षक मीच असून निवडणूकीबाबत निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार  मलाच आहे, परंतु उबाळे यांना येथील काही कार्यकर्त्यांनी आमदार बळीराम सिरसकर यांना खोटेनाटे सांगून पत्र देण्यास भावनिक केले. त्यामुळे त्यांनी उबाळे यांना  पाठिंब्याचे पत्र दिले. वास्तविक पाहता अशाप्रकारचे कोणतेही पत्र त्यांना अधिकृतपणे देता येत नाही, असे तायडे यांनी सांगितल्यामुळे पक्षात दोन गट तयार झाल्याचे  दिसून येत आहे. यामुळे मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला असून भारिपचा नेमका अधिकृत उमेदवार कोण? असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.
भारिपच्याच आमदाराने व पक्ष निरीक्षकाने दिलेले पत्र उबाळे यांच्याकडे आहे. तर पक्ष निरीक्षक तायडे यांनी पत्रकार परिषद घेवून जाहीर केले आहे की, आमचा  अधिकृत उमेदवार जिजाबाई रिंढे असून त्यांनाच अधिकृतपणे उमेदवारी दिली आहे. मग जनतेला प्रश्‍न पडतो की नेमका आमदार सिरसकरांचा आदेश मानायचा की  भिमराव तायडे यांचा आदेश मानायचा. एक नव्हे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने उद्भवत आहे. भारिप बहुजन महासंघ बहुजनांना संधी देवून सत्ता मिळविण्याचा एकमेव  प्रयत्न करत असतो. यात बुलडाणा न.प.च्या निवडणूकीत नजमुन्नीसा मो.सज्जाद यांना उमेदवारी देवून पक्षाला नगराध्यक्षपद मिळविण्यात भारिपला यश आले आहे.  हाच फार्म्युला राबवून पक्षाने न.प.मध्ये तीन नगरसेवकही निवडून आणले आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये लहासे यांना उमेदवारी देवून  उपाध्यक्षपद काबीज केले.त्यामुळे सत्ता बदलाचा करीश्मा भारिप बहुजन महासंघाकडे असल्यामुळे याच धर्तीवर अनेकजण याच पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी  प्रयत्नरत असतात. मात्र, पक्षांतर्गत गटबाजीमुळे घाटाखाली आणि घाटावर असा भेदभाव सर्वच पक्षात आहे, तसाच याही पक्षात दिसून येत आहे. भारिपचे  घाटाखालील जिल्हाध्यक्ष म्हणून राजाभाऊ भोजने यांची नुकतीच निवड करण्यात आली. मात्र घाटावरील जिल्हाध्यक्ष पदाची निवड अद्याप करण्यात आलेली नाही.  पक्ष निरीक्षक भिमराव तायडे हे घाटाखालील असल्याने घाटावरील कार्यकर्ते त्यांना जिल्हाध्यक्ष म्हणून स्वीकारण्यास तयार नसल्याने अंतर्गत कलह वाढत आहे.  त्यामुळे काही कार्यकर्ते ज.वि.पवार यांच्या संपर्कात आहेत तर काही कार्यकर्ते आ.बळीराम सिरसकर यांच्या संपर्कात आहेत. शेवटी पक्ष एक आणि भानगडी अनेक  अशी गत नेत्यांसह कार्यकर्त्यांची झाली आहे. सर्वसामान्य जनता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष असल्याने आणि ते एक  तत्वनिष्ठ व विचारवंत नेते असल्याने या पक्षाला लोकांनी जवळ केले आहे. हा पक्ष मोठा आहे. अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी सत्तेसाठी आजपर्यंत कधीही लाचारी  पत्कारली नाही किंवा विचारांशी तडजोडही केली नाही. ‘भिक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची’ असे म्हणत अनेक काळ पक्षाने संघर्ष केला आहे. अकोला महानगर  पालिका, जिल्हा परिषद आणि जनमतांच्या आधारावर अनेक आमदार जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, सरपंच, नगरसेवक निवडूण आणले. अनेकांना सत्तेवर बसवले.  आणि आता याच पक्षावर बहुजनांनी विश्‍वास ठेवून बाळासाहेबांचे नेतृत्व मान्य केले आहे. अशा परिस्थितीत पक्षाच्या नेत्यांकडून, कार्यकर्त्यांकडून अंतर्गत गटबाजी  चव्हाट्यावर आल्यास तमाम बहुजनांच्या भावना दुखावण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज बहुतेक सर्वच नेत्यांची अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट  होणार असून बाळासाहेब जो निर्णय घेतील तोच निर्णय अंतिम राहील, म्हणून सावळा सुंदरखेड ग्रामपंचायत निवडणूकीत पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण असेल याची  उत्सूकता सर्वांनाच लागली आहे.