Breaking News

शोध व संशोधनानेच देश समृद्ध होईल - प्रकाश जावडेकर

पुणे, दि. 02, ऑस्टोबर - शोध आणि संशोधनानेच देश समृध्द होइल. यापुढील काळात उच्च शिक्षणाच्या धोरणाचा हाच आधार असेल आणि त्याला चालना  मिळण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज येथे व्यक्त केले.  विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने  देशातील आंतर विद्यापीठीय केंद्रांतर्फे आयोजित शोध, शिक्षण आणि समीक्षा या कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम आयुकाच्या चंद्रशेखर सभागृहात पार पडला.  ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर, आयुकाचे संचालक डॉ. सोमक रायचौधरी, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष व्ही. एस. चौहान आदी मान्यवर यावेळी  उपस्थित होते. 
जावडेकर म्हणाले, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण स्पष्ट आहे . देशात विज्ञानाचे वातावरण व्हायला हवे. संशोधनाच्या  क्षमतांचा पूर्ण उपयोग व्हायला हवा आणि त्यासाठी सर्व विभागांच्या सहकार्याने आणखी आंतर विद्यापीठीय केंद्रे उभारली जातील असे त्यांनी सांगितले. दरम्यान,  दुसर्‍या कार्यक्रमात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आयोजित राज्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या शोध प्रकल्पांची  माहिती प्रकाश जावडेकर यांना दिली. यावेळी त्यांनी डीपेक्स 2017 मधील विजेत्यांशी संवाद साधला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितिन  करमळकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.