Breaking News

एल्फिस्टनच्या निष्पाप बळींना जबाबदार कोण...?

 दि. 01, ऑक्टोबर - आले देवाजीचे मना,तिथे मानवाचे चालेना अशी एक म्हण आहे.विवेकाच्या पातळीवर ही म्हण माणसाचा नाकर्तेपणा सिध्द करते.नैसर्गीक  आपत्ती साठी देव आणि दैव या दोन गोष्टी जबाबदार आहेत असे मानून आपण आपली जबाबदारी झटकून मोकळे होतो.माञ हे संकट का आले? थोड्याशा  खबरदारीने हे संकट टाळता आले असते का? किंबहूना संकट  येणार याची आगाऊ सुचना मिळूनही दाखवलेला फाजील आत्मविश्‍वास ,त्यातून निर्ढावलेला  बेजबाबदारपणा यावर कालच्या एलफिस्टन दुर्घटनेची मिमांसा व्हायला हवी.
शुक्रवारची सकाळची वेळ,मुंबईची जीवन वाहीनी समजली जाणार्या लोकलवर भरोसा असलेले लाखो प्रवाशी या वेळी आपली रोजी रोटी कमावण्यासाठी घरातून बाहेर  पडत आपल्या कार्य मार्गाचा माग धरतात.त्याप्रमाणे शुक्रवारीही ही दैनंदिनी सुरू असतांना अचानक ब्रेंकीग येते.परळ- एलफिस्टन रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी......दोन  मृत,नंतर सात ,दहा आकडा बावीसवर येऊन थांबला.आणि 39 जणांना जखमी करून या वृत्ताने विश्रांती घेतली.
घटना भयानक होती.घटनाक्रम कानावर पडत असतांना आमच्यासारख्या शेकडो हजारो श्रवण दर्शींच्या काळजाचे ठोके क्षणाक्षणाला चुकत होते.आमच्यासारखे  अनेकजण यापुर्वी या पुलवरून कित्येकदा गेलेत.आज या घटनेत आम्ही प्रत्यक्ष बळी ठरत नसलो तरी ती कल्पनाच जे बळी ठरलेत त्यांच्या ओढवलेल्या प्रसंगाची  कल्पना देण्यास पुरेशी आहे.
ही घटना म्हटले तर निव्वळ एक अपघात आहे.म्हटले तर बेजबाबदारपणाची परिणीती आहे.जेथे ही घटना घडली त्या पुलाची अवस्था अशा प्रकारच्या अपघातांना  निमंञण देणारी आहे,तरीही रेल्वे प्रशासनाने,स्थानिक लोकप्रतिनिधींनी दाखवलेला बेजबाबदारपणा या दुर्घटनेला जबाबदार आहे हे नाकारता येणार नाही.
या घटनेत जे बळी ठरलेत,जखमी झालेत त्यांचा काय दोष होता हो? आयुष्याचे वेगवेगळे स्वप्न उराशी घेऊन बाहेर पडलेला प्रत्येक जण नेहमीप्रमाणे आपला  दैनंदीन कार्यभार उरकण्यासाठी या पुलावरून वावरत होता.सोबत सायंकाळी घरट्याकडे परतून कुटूंबासोबत हितगूज करण्याचे स्वनही होते.माञ एका क्षणात त्या  बाबीस निष्पाप जीवांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला.
घटनेच्या पश्‍चात नेहमीसारख्या घोषणाही झाल्यात.लाखोच्या भाषेत भरपाई मिळेलही पण ते बावीस जीव आणि त्यांचे ते स्वप्न परत देता येतील का?  बावीस जीव  घेणार्या बेजबाबदारपणाला सजा होईल का? हे प्रश्‍न कधीच उत्तर न मिळणारे आहेत.
अनेकांच्या दृष्टीने हा अपघात असेल.अगदी सुरूवातीलाच म्हटल्यांप्रमाणे नियतीचा खेळ किंवा  दैववादावर या अपघाताची जबाबदारी सोडून अनेक जण मोकळे  होतील.पण हा अपघात असला तरी अपघाताची खरी कारणं शोधून जबाबदार आसणार्या मंडळींना सजा व्हायला हवी.या पुलाची एकूण अवस्था लक्षात घेता असा  एखादा अपघात होणार याची शंका यापुर्वी अनेकदा व्यक्त केली गेली असतानाही रेल्वे प्रशासनाने दाखवलेली उदासिनता आणि त्याहूनही अधिक बेजबाबदारपणा खर्या  अर्थाने कारणीभूत ठरला आहे,या अपघाताची जबाबदारी जेव्हढी जबाबदारी आहे तेव्हढीच जबाबदारी टीवटीव करणार्या लोकप्रतिनिधींचीही आहे,सार्या जगाचा  गैरव्यवहार चव्हाट्यावयर आणून चमकोगीरी करण्याची मर्दूमकी गाजविणारे लोकप्रतिनिधी स्वतःच्या बुडाखाली जमलेली घाण काढण्यात बेजबाबदारपणा दाखविताता  तेंव्हा अशा निष्पाप नागरिकांचा बळी जाण्याचे पातक त्यांच्याच माथी पडते.हेच या अपघातामागचे खरे वास्तव म्हणायला हवे.