Breaking News

दिवाळीनिमित्त ’आदिनाथ’कडून सभासदांना खराब साखर; परिसरात तणाव

पुणे, दि. 16, आक्टोबर - ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिवाळीनिमित्त खराब साखर वाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार करमाळा तालुक्यात उघडकीस आला आहे. करमाळा  तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्यावतीने ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना दिवाळीनिमित्त साखर वाटण्यात येत आहे. वाटण्यात येणारी ही साखर पिवळ्या  रंगाची आणि खराब असताना देखील कारखान्याच्यावतीने साखर वाटप सुरू होते. 2005-06 हे वर्ष असलेल्या पोत्यातून साखर वाटप केल्यामुळे करमाळा तालुक्यात तणावाचे  वातावरण निर्माण झाले आहे.ही पिवळसर दिसणारी साखर ऊस उत्पादक शेतकर्‍यांना वाटण्यात आलेली साखर आहे. करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर क ारखान्याने सभासदांना दिवाळीनिमित्त ही साखर वाटली. गेल्या एका वर्षापासून साखर कारखाना बंद आहे. 18 महिन्यांचे कामगारांचे पगार दिलेले नाहीत. मागील एक हंगाम साखर  कारखाना चाललाच नाही, अशा परिस्थितीमध्ये गेल्या 3 महिन्यांपूर्वी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत रश्मी बागल आणि दिग्विजय  बागल या बहीण-भावांनी सत्ता कायम ठेवली. 
कारखान्याची सत्ता मिळाल्यामुळे दिवाळीला ऊस उत्पादक शेतकर्‍यांना खूष करण्यासाठी साखरेचे वाटप करण्यात येत आहे. शेतकर्‍यांची दिवाळी गोड करण्यासाठी आदिनाथ क ारखान्याच्यावतीने वाटप करण्यात येत असलेली साखर जुनी आणि लालसर असल्याचे समोर आले. ही साखर आरोग्यास अपायकारक ठरण्याची शक्यता असल्यामुळे काही वाटप  केंद्रावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. 8 दिवसांपासून हे साखर वाटप सुरू आहे. 28 रुपये किलो दराने 25 किलो साखरेचे वाटप सध्या तालुकाभर सुरू आहे. यातील काही  ठिकाणी वितरित केलेली साखर लालसर, काळपट आणि मुंग्या असलेली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर बालेवाडी (ता. करमाळा) येथील साखर वाटप केंद्रावर काही सभासदांनी  साखर नाकारली. काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर येथील साखर वाटप केंद्र बंद करण्याची नामुष्की कारखान्यावर आली. वरकटणे येथेही यावर वाद झाला.  अशीच साखर इतर भागात वितरीत झाली आहे. वितरीत होत असलेल्या साखर पोत्यांवर सन 2005-2006 हे साल छापलेले आढळून आले. सध्या सोशल मीडियातून या पोत्याचे  आणि लालसर साखरेचे फोटो फिरत असल्याने सभासदांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. जुनी साखर वाटप करणे हे बेकायदेशीर आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त जुनी साखर वाटप  करता येत नाही. यासंदर्भात ’आदिनाथ’च्या संचालिका रश्मी बागल यांनी साखर चांगली असल्याचे म्हटले आहे. तसेच सन 2005 -2006 असा शिक्का असलेल्या पोत्यात चुकून  कामगारांकडून साखर भरली गेली. एवढी जुनी साखर शिल्लक असूच शकत नाही. त्यामुळे चूक केल्यामुळे 2 कामगारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कारखाना सुरू  होऊ नये, यासाठी विरोधक प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे सभासदांनी अफवांना बळी पडू नये, असे बागल यांनी म्हटले आहे.