बहिण-भावाचे नाते हे आपल्या संस्कृतीचे द्योतक - गिरीष बापट
पुणे, दि. 16, आक्टोबर - आपण विज्ञानात मोठी प्रगती केली आहे, यात दुमत नाही. परंतु काळाच्या ओघात आपल्या संस्कृतीपासून आपण दुरावत आहोत. समाजातील कुटुंब व्यवस्था कोलमडताना दिसत आहे. बदलत्या परिस्थितीनुसार नोकरीनिमित्त वेगळे रहावे लागते, परंतु तरीही नात्यामधील जिव्हाळा कायम राहिला पाहिजे. भाऊबीज, रक्षाबंधन हे सण हे बहिण-भावाच्या नात्यातील जिव्हाळा टिकविणारे सण आहेत त्यामुळे बहिण भावाचे नाते हे आपल्या संस्कृतीचे द्योतक आहेत, असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी केले.प्रभात जन प्रतिष्ठान आणि प्रभात मित्र मंडळातर्फे पूर्व भागातील गरजू आणि निराधार महिलांसाठी प्रभात आपलुकीची भाऊबीज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगरचे संघचालक रवींद्र वंजारवाडकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर, नगरसेवक सम्राट थोरात, अजय खेडेकर, नगरसेविका विजयालक्ष्मी हरीहर, आरती कोंढरे, प्रभात जन प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर चव्हाण, सचिन भोसले, कुणाल जगताप, उदय वाडेकर, आदी उपस्थित होते. यावेळी पूर्व भागातील महिलांना दिवाळीपूर्वीच दिवाळीचे साहित्य व धान्य भेटवस्तू म्हणून देण्यात आले. प्रतिष्ठानचे रविंद्र भन्साळी, मंगेश शिंदे, राजेश नाईक, निलेश कांबळे, गोविंद मोरे, नितीन अरगडे, केतन भागवत,ओंकार नाईक, हेमराज साळुंके यांनी सक्रिय सहभाग घेतला.गिरीष बापट म्हणाले, आजच्या काळात मनाला संस्कारांची गरज आहे. अन्न दिले नाही तर माणूस मरेल पण मन संस्कारीत नसेल तर माणुसकी मरेल. प्रभात जनप्रतिष्ठानतर्फे राबविली जाणारी ही अनोखी भाऊबीज आपुलकीच्या नात्याचा संदेश देणारी आहे. गरजू आणि निराधार महिलांना मदत करीत माणुसकी टिकविण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.रेणू गावस्कर म्हणाल्या, आयुष्य एकदाच मिळते ते सुंदर बनवा. दुख: आणि पराभव प्रत्येकाच्या आयुष्यात येतात परंतु त्यामुळे खचून जाऊ नका. आपल्या मुलींना पुढे येण्यासाठी प्रोत्साहन द्या. स्वाती महाडिक सारख्या स्त्रियांचा आदर्श पुढे ठेवून संकटांशी लढायला शिका. मदत करणारे लोक अनेक असतात परंतु पुढे येण्याची हिंमत असली पाहिजे.