Breaking News

सरकारच्या प्रसिध्दीसाठी खाजगी कंपन्यावर 300 कोटींची उधळपट्टी कशासाठी ? : खा. अशोक चव्हाण

मुंबई, दि. 16, आक्टोबर - सरकारच्या कामाची व धोरणांची प्रसिध्दी करण्यासाठी सरकारकडे स्वतंत्र माहिती व जनसंपर्क विभाग कार्यरत असताना जनतेच्या खिशातील 300 क ोटी रुपये खर्चून सरकारच्या प्रसिध्दीचे काम खाजगी कंपन्यांना कशासाठी ? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी सरकारला केला आहे.
पुढे ते म्हणाले, सध्याच्या सरकारने निव़डणुकीपुर्वी अनेक खोटी आश्‍वासने देऊन अच्छे दिनाची स्वप्ने दाखविली होती. परंतु सत्तेत येताच या आश्‍वासनांचा सरकारला सोयिस्कररित्या  विसर पडला. त्याचबरोबर सध्याच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जनतेत तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून परिणामी सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनता सरकार  विरोधात आपला रोष व्यक्त करीत आहे. त्यामुळे सरकारने सोशल मिडीयाचा चांगलाच धसका घेतला असून या भितीतूनच सोशल मिडियावर सरकार विरोधात पोस्ट लिहणार्‍या युवक  आणि पत्रकारांना नोटीसा पाठविल्या जात आहेत. परंतु अशा नोटीसा पाठवून सरकार जनतेचा आवाज दाबू शकत नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्ही युवकांच्या पाठीशी आहोत.
आज सरकारकडे माहिती व जनसंपर्क विभाग असताना, अशा पध्दतीने खाजगी कंपन्यांना काम दिले आहे, यावरुन सरकारचा आपल्याच विभागाच्या कामावर विश्‍वास नसल्याचे  दिसून येते, एकीकडे सरकार जाहिरातींवर हजारो कोटी रुपये उधळत असताना आता पुन्हा नव्याने सरकारच्या प्रचारासाठी उधळपट्टी कशाला असा सवाल खा.अशोक चव्हाण यांनी  सरकारला केला.