एक मराठा लाख मराठा घोषवाक्य असलेले आकाशकंदील
पुणे, दि. 16, आक्टोबर - मराठा समाजातील 4 सुशिक्षित तरुणांनी एक मराठा लाख मराठाचे असे घोषवाक्य असलेले आकाशकंदील बनवले आहेत. या माध्यमातून मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यावर प्रकाश टाकण्याता आला आहे. विशेष म्हणजे हे आकाश कंदील बनविण्याची मुहूर्तमेढ माढा तालुक्यातील तांदुळवाडी गावात रोवण्यात आली.मराठा समाजातील तांदुळवाडी गावच्या दोघा तरुणांनी व बार्शी तालुक्यातील काटी येथील एका व धनकवडी (पुणे) येथील तरुणांनी हे आकाशकंदील बनवले आहेत. महेश गवळी (रा.तांदुळवाडी ता.माढा),विनायक गावडे (रा.धनकवडी जि.पुणे),रत्नाकर सातपुते (काटी, ता.बार्शी),दिंगबर गवळी(रा.तांदुळवाडी, ता.माढा) या तरुणांनी दिवाळीत आकाशकंदील बनविण्याचा बेत आखला होता. त्या नुसार तांदुळवाडी गावात आकाशकंदील बनविण्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. बाजारात हा आकाशकंदील चालेल का याची चाचपणी केली गेली. यास बाजारपेठेतुन प्रतिसाद मिळु लागल्यानंतर या आकाश कंदीलचे उत्पादन वाढविण्यात आले.त्यानुसार आता हा आकाशकंदील राज्याच्या कानाकोपर्यात जाऊन पोहचला आहे. केवळ शंभर रुपयात बाजारात उपलब्ध असणारा हा आकर्षक असा केशरी रंगाचा आकाशकंदील लोक खरेदी करीत आहेत. या आकाश कंदीलावर एक मराठा लाख मराठा अर्थात मराठा क्रांती मोर्चाचा लोगो टाकण्यात आला असुन राष्ट्रमाता जिजाऊ, कुळवाडी भुषण छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज याचे फोटो आहेत.