Breaking News

अखेर जिल्हा बँकेच्या भरतीला सरकारकडुन स्थगिती

अहमदनगर, दि. 31, ऑक्टोबर - अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नियमबाह्य नोकरभरती   प्रक्रिया राबविली असून भरतीत गैरव्यवहार झाल्याने ती रद्द करण्यात यावी  तसेच बँकेचे वरीष्ठ अधिकारी रावसाहेब वर्पे व किशोर भिंगारकर यांना निलंबीत करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी सहकारंत्री सुभाष देशमुख यांच्या  दालनात बुधवारी (दि.1) रोजी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराजे दहातोंडे यांनी दिली होती. मात्र या भरतीला  सरकारकडुन स्थगिती मिळाली असून पुढील आदेश येत नाही तोपर्यंत कोणतीही प्रक्रिया होणार नसल्याची माहिती हाती आली आहे. 
जिल्हा बँकेच्या नोकरभरती प्रकरणी यापूर्वीच आपण सहकार आयुक्तांकडे तक्रार करून सदर भरती प्रक्रियेच्या चौकशीची मागणी केली होती. सहकार आयुक्तांनी चौकशी करण्याचे  आदेश दिले होते. यानंतर आज या भरती प्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे.
सदरील जिल्हा सहकारी बँकेने मनमानी व नियमबाह्य पध्दतीने पात्र उमेदवारांची यादी जाहीर करून सहकार आयुक्तांचा आदेश धुडकावला होता, त्या मनमानी कारभाराला आता  चाप बसला आहे.  भरती प्रक्रियेच्या चौकशीचे आदेश सोशल मिडीयावर सोमवारी पहावयास मिळाले. जिल्हा सहकारी बँकेने अंतिम पात्र उमेदवारांची यादी जाहीरच कशी केली ?  असा सवाल दहातोंडे यांनी केला होता. अधिकार्‍यांच्या मनमानी कारभारामुळे अन्याय झालेल्या उमेदवारांध्ये असंतोष आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे व  सरव्यवस्थापक किशोर भिंगारकर यांनी बँकेचे पूर्ण वेळ प्रतिनिधी म्हणून या प्रकरणात बजावलेली भूमिका संशयास्पद असल्याचाही आरोप करण्यात आला होता. या दोघांचीही मुले  व निकटवर्तीय या भरती प्रक्रियेत आहेत. त्यामुळे वर्पे व भिंगारकर या दोघाही अधिकार्‍यांना तातडीने निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशीही  मागणी संभाजीराजे दहातोंडे यांनी केली होती.