Breaking News

फिफा अंडर 17 विश्‍वचषक स्पर्धेच्या निमित्ताने ठाण्यातील ग्रामीण भागात आदिवासी मुलेही खेळणार फुटबॉल

ठाणे, दि. 15, सप्टेंबर - भारतात पुढील महिन्यात होणार्‍या विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसठी महाराष्ट्रात उद्या 15 सप्टेंबरला एकाच दिवशी 10  लाखापेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत.
टीम स्पिरीट निर्माण करण्यासाठी फुटबॉलसारख्या खेळाचा निश्‍चित उपयोग होईल असे यावेळी विभागीय आयुक्त डॉ जगदीश पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ  महेंद्र कल्याणकर यांनी देखील यामुळे क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे असे सांगितले. यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी मीना यादव,उपविभागीय  अधिकारी सुदाम परदेशी हे देखील उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते मुलामुलींना फुटबॉलचे वाटप करण्यात आले तसेच प्रत्यक्ष फुटबॉलला किक मारून त्यांनी या मोहिमेचा शुभारंभ केला.
महाराष्ट्र मिशन 1- मिलियन योजनेअंतर्गत राज्यभरातील सुमारे 30 हजार शाळांमध्ये प्रत्येकी 3 याप्रमाणे 1 लाख फुटबॉलचे वाटप केले जात आहे. प्रत्येक शाळेने  किमान 50 विद्यार्थी जे फुटबॉल खेळणार आहेत त्यांची नावे, पत्ते इ. माहिती क्रीडा विभागाला कळविणे सुरु केले आहे. त्यामुळे अंदाजे सुमारे 15 लाख विद्यार्थी या  महोत्सवात सहभागी होतील.
ठाण्यात यानिमित्त 17 वर्षांखालील मुलांसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. विजयी संघास 1 लाख तर  उपविजेत्या संघाना अनुक्रमे 75 हजार आणि 50 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. शिवाय संघांना चषकही दिले जातील असे यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी  प्रमोदिनी अमृतवाड यांनी सांगितले.
अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, कल्याण, भिवंडी, ठाणे मनपा , कल्याण डोंबिवली पालिका याच्या विविध शाळांमध्ये मिळून 100 फुटबॉल मैदाने महाराष्ट्र मिशन 1-  मिलियनमधील स्पर्धांसाठी तयार करण्यात आली आहेत.