Breaking News

आरक्षण संपविणार्‍यांविरुद्ध तीव्र लढा द्या : जे.एस.पाटील

बुलडाणा, दि. 18, ऑक्टोबर  - दि.14 ऑक्टोबर रोजी सामाजिक न्याय भवन, समाजकल्याण कार्यालय बुलडाणा येथे आरक्षण बचाव परिषद पार पडली. स्वतंत्र मजदूर युनियन,  महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना तथा स्थानिक आरक्षण बचाव कृती समिती, बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आरक्षण बचाव परिषदेत  जे.एस.पाटील यांनी वरील विधान केले. 
यावेळी पाटील म्हणाले की, भारतीय संविधानाद्वारे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गांना शैक्षणिक व सेवा विषयक आरक्षण प्रदान करण्यात येवून सर्वांना समान संधी व  समान न्यायाचे तत्व स्वीकारण्यात आल्यामुळे या देशातील मुठभर लोकांनी शिक्षण सत्ता, संपत्ती व सर्व प्रकारच्या अधिकाराचा उपयोग घेतला. त्यांनी संविधानाचा अंमल सुरु  झाल्यापासून आरक्षणाला न्यायालयाच्या माध्यमातून आव्हान देणे सुरु केले. जेव्हा जेव्हा आरक्षणावर न्यायालयाच्या माध्यमातून आघात होतो तेव्हा आरक्षणाचा लाभ घेणारे कर्मचारी  शांत असतात, ते हल्ले करतात आम्ही मात्र बचावाची भूमिका घेतो, आरक्षण विरोधक सातत्याने घटनात्मक तरतुदीला व संविधान संशोधनाला आव्हान देत असतात म्हणून अनुसू चित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, विशेष प्रवर्ग या संवर्गातील सर्व कर्मचार्‍यांनी न्यायालयीन लढाईसह रस्त्यावरील लढाईसाठी आता पुढे आले पाहिजे.
या परिषदेला एस.के.हनवते केंद्रीय संघटक म.रा.मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन, अमरावती, एस.के.अलोने उपकार्यकारी अभियंता जि.प.बांधकाम विभाग बुलडाणा यांनीही  आपले विचार मांडले. सेवानिवृत्त उप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पी.एल.हेलोडे यांनी केले. सूत्रसंचालन एन.आर.वानखेडे  यांनी केले तर एस.जी.रोकडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वतंत्र मजदूर युनियन, मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, म.रा.कास्ट्राइब कर्मचारी कल्याण  महासंघ, बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटना, एस.टी.कास्ट्राइब संघटना, गुरु रविदास सत्यशोधक समाज, सामाजिक न्याय विभाग कर्मचारी सांघटना, विदर्भ कोकण ग्रामीण ब ँक कर्मचारी संघटना आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.