Breaking News

रस्ता लुट करणार्‍या टोळीचा पर्दाफाश; जळगाव पोलिसांची कामगिरी

जळगाव, दि. 18, ऑक्टोबर - हवाल्याच्या रोकड रकमेवर डोळा ठेवून रस्ता लूट करणार्‍या टोळीचा पर्दाफाश येथील शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने नुकताच केला होता. पो लिसांनी जळगाव येथून दोन व धुळे येथून दोन असे चार संशयित जेरबंद करून त्यांना धुळे पोलिसांच्या स्वाधीन केले होते. हवाल्याची रोकड लूट करण्यासाठी राज्यातील अट्टल  अशी वीस गुन्हेगारांची टोळी सक्रिय झाली असून त्यांचे नेटवर्क राज्यभर असल्याची माहिती शुक्रवारी सुत्रांनी दिली. दरम्यान, रस्ता लुटीच्या या जबरी चोरीच्या गुन्ह्यात जळगाव  येथील आणखी तीन संशयितांची नावे तपासातून समोर येत असल्याच्या वृत्तास सुत्रांनी आज दुजोरा दिला. परंतु संशयितांच्या मुसक्या आवळणे आवश्यक असल्याने त्यांच्या  नावाबाबत गोपनीयता ठेवण्याची खबरदारी पथकाने ठेवली आहे. हवालाची रक्कम गुजरातहुन जळगाव तसेच येथून गुजरात पुन्हा रवाना केली जाते. या रकमेला लुटण्यासाठी ही टोळी  पध्दतशीर माहिती काढुन प्लॅन करून लक्झरी लुटत होती. अशा पध्दतीचे गुन्हे धुळे, साक्री, नवापूर येथे घडले असून पोलिसात गुन्हे दाखल आहेत. हवाल्याच्या रकमेव्यतिरिक्त  खासगी वाहनातून मोठी रोकड नेली जात असल्याची माहिती टोळीस मिळाल्यास वाहन कोठुन निघाले, ते कोणत्या मार्गे कोठे जात आहे,याबाबतची इत्यंभूत माहिती काढल्यानंतर  रोकड सहज हाती येईल, अशा ठिकाणी लूट करण्याची फिल्डींग लावली जात होती. शस्त्राचा धाक दाखवून ऐवज हस्तगत करत पलायन करण्यात ही टोळी माहीर आहे. मोठ्या रक मा लुटीचे गुन्हे या टोळीने यापूर्वी राज्यात अनेक ठिकाणी केले असून त्यांचे कनेक्शन सुरत येथे असल्याचे तपासातून समोर आले आहे.
दरम्यान, धुळे पोलिसांचे पथकास सुरत येथील काही नावांची माहिती तपासातून हाती लागली असून या संशयितांना जेरबंद करण्यासाठी आज एक पथक थुळे येथून गुजरातकडे  मार्गस्थ झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. या टोळीत यापूर्वी शहर पोलिसांनी दोन संशयिताना जेरबंद केले असून आणखी तिघे या टोळीत सक्रिय असल्याची माहिती सुत्रांच्या  हाती लागली आहे. म्हणजेच हवाला रक्कम लुटीच्या टोळीत जळगाव येथील पाच जण सामील होते, असे तपासातून पुढे येत आहे.