Breaking News

भवानीनगर येथे 90 हजाराहून अधिक किंमतीचा तेलाचा साठा जप्त

सांगली, दि. 18, ऑक्टोबर - अन्न व औषध प्रशासन कातर्फे अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर भेसळ  रोखण्यासाठी पथक तयार ठेवण्यात आले होते. या पथकास मिळालेल्या माहितीवरून वाळवा तालुक्यातील मे. पाटील ट्रेडर्स भवानीनगर येथे धाड घालण्यात आली. यामध्ये रिफाईंन्ड  सोयाबिन व सरकी तेलाचा 90 हजार 471 रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला, अशी माहिती सहायक आयुक्त (अन्न) एस. बी. कोडगीरे यांनी दिली.
कोडगीरे म्हणाले, या पेढीस अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार परवाना नव्हता. भेसळीच्या संशयावरून पेढीत आढळलेल्या रिफाईंन्ड सोयाबिन व सरकी तेलाचे नमुने विक्रेता व  मालक सदाशिव सावंत यांच्याकडून तपासणीस घेतले. रिफाईंन्ड सोयाबिन तेलाचे 15 डबे एकूण वजन 223.4 कि.ग्रॅ. व रिफाईंन्ड सरकी तेलाचे 55 डबे एकूण वजन 823.4 कि.ग्रॅ.  असा साठा जप्त करण्यात आला. घेण्यात आलेल्या नमुन्यांचा विश्‍लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यात येईल. या पेढीस  विनापरवाना व्यवसायाबाबत नोटीस पाठविण्यात आली आहे. ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) एस. बी. कोडगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी द. ह. कोळी, आर.  आर. शहा व नमुना सहायक श्री. कवळे यांनी केली.