Breaking News

परदेशी भामट्यांकडून उद्योजकाची एक कोटींची फसवणूक

पुणे, दि. 02, ऑस्टोबर - ऑईल खरेदीसाठी ऑनलाईन पैसे भरायला लावून दोन परदेशी भामट्यांनी चिंचवड येथील एका उद्योजकाची तब्बल एक कोटी चार  लाख 47 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार नुकताच चिंचवड येथे उघडकीस आला.
या प्रकरणी फिलीप ब्राऊन, ऑलीव्हा जॉन्सन या परदेशी भामट्यांविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत  कमलेश बच्छानी (वय 46, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी माहिती दिली. कमलेश बच्छानी हे उद्योजक आहेत. त्यांना (Udara liquid herbal oil) ची आवश्यकात होती. जून ते 12 सप्टेंबर दरम्यान फिलीप आणि ऑलीव्हा या परदेशी भामट्यांनी बच्छानी यांच्याशी ई-मेल व दूरध्वनीवरून संपर्क साधला.  ऑईल उपलब्ध करुन देण्याचे आश्‍वासन दिले. बच्छानी यांचा विश्‍वास संपादन केला.
या भामट्यांनी बच्छानी यांना ऑईल खरेदीसाठी वारंवार ऑनलाईन पैशांचा भरणा करण्यास सांगितले. त्यावर विश्‍वास ठेऊन बच्छानी यांनी तब्बल एक कोटी चार  लाख 47 हजार रुपयांचा ऑनलाईन भरले. त्यानंतर बच्छानी यांनी आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी टाळाटाळ करु लागले. त्यामुळे आपली  फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बच्छानी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.