Breaking News

7 शहरांमध्ये वीज चोरांविरुद्ध महावितरणच्या आकस्मिक धाडी

बुलडाणा, दि. 02, ऑक्टोबर - वीजचोरी व अनधिकृत वापराविरोधात महावितरणने ठोस पाऊले उचलत बुलडाणा जिल्ह्यातील निवडक सात शहरांमध्ये 29 सप्टेंबर रोजी एकाचवेळी आकस्मिक कारवाई केली या मोहिमेमध्ये एकूण 82 ठिकाणी कारवाई करण्यात आली यामध्ये 83 हजार 441 वीजयुनिटची म्हणजे जवळपास 11 लाख रुपयांची वीज चोरी झाल्याचे निदर्शनास आले. वीजचोरी व अनियमितता आढळून आल्यामुळे 82 जणाविरुद्ध भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135 व 126 नुसार कारवाई करण्यात आली.
आरएपीडीआरपी योजनेमध्ये जिल्ह्यातील अनुक्रमे बुलडाणा, चिखली, खामगाव, शेगाव, मेहकर, मलकापूर व नांदुरा यांचा समावेश आहे, या शहरात सर्वोत्तम वीज सेवा देण्यासाठी विविध कामे सुरु असून यासोबतच वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नशील आहे. वीज चोरीला अटकाव घालण्यासाठी प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत व मुख्य अभियंता अरविंद भादिकर यांच्या निर्देशानुसार अधिक्षक अभियंता गुलाबराव कडाळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंते, अधिकारी व जनमित्र मिळून 37 पथकामध्ये जवळपास 251 जणांचा वरील शहरात केलेल्या कारवाईच्या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग होता.