Breaking News

रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे 5 नोव्हेंबरपर्यंत बुजविणार

रत्नागिरी, दि. 27, ऑक्टोबर - मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे भरण्याचे काम सुरू असून ते 5 नोव्हेंबपर्यंत पूर्ण करण्यात  येईल, असे आश्‍वासन राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश गायकवाड यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांना दिले. जिल्ह्यातील कशेडी ते  परशुराम घाटातील सिमेंट-काँक्रीट रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यात सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. महामार्गावरील खड्डे आणि  चौपदरीकरणाला झालेल्या विलंबाबाबत फसवणूक होत असल्याची टीका प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार हुसेन दलवाई यांनी कालच चिपळूण येथे केली होती.
रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनांचे मोठ्याप्रमाणात अपघात होत आहे. यात अनेक वाहनचालक जखमी होत आहेत, तर काहींना  आपले प्राणही गमवावे लागत आहेत. यासंदर्भात प्रसिद्ध होणार्‍या तसेच वाहिन्यांवर दाखविण्यात येणार्या बातम्यांची गंभीर दखल पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी घेतली. त्यानंतर काल  (दि. 25 ऑक्टोबर) यासंदर्भात खेड येथे बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश गायकवाड आणि ते कशेडी ते परशुराम घाट या राष्ट्रीय  महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणारे कंत्राटदार श्रीकांत बाकळे उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांनी चौपदरीकरणाच्या कामाचा तसेच जिल्ह्यात महामार्गावर खड्ड्यांच्या  दुरुस्तीचा आढावा घेतला. त्यानुसार कशेडी ते परशुराम घाट या 44 किलोमीटरच्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून 5 नोव्हेंबपर्यंत ते पूर्ण क रण्यात येईल, असे आश्‍वासन गायकवाड यांनी पालकमंत्र्यांना दिले. तसेच कशेडी ते परशुराम घाट सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम नोव्हेंबरच्या दुसर्या आठवड्यात  सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही गायकवाड यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडले आहेत. ते खड्डे युद्धतापळीवर बुजवून जिल्ह्यातील जनतेला तसेच वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशा सूचना  पालकमंत्र्यांनी प्रकाश गायकवाड यांना दिल्या.