Breaking News

नाशिक विमानसेवा 15 डिसेंबर पासून ; उड्डाण मंत्रालयाचे लेखी आश्‍वासन

नाशिक, दि. 27, ऑक्टोबर - राज्यातील विमानसेवेसाठी मुंबई विमानतळावर टाईम स्लॉटची उपलब्धता करून द्यावी या मागणीसाठी शिवसेनेने दिल्लीत केंद्र शासन आणि जीव्हीके  कंपनीविरोधात मोर्चा काढला. खा. हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी जीव्हीके कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान,  आंदोलनाची दखल घेत 15 डिसेंबरच्या आत विमानसेवा सुरू करण्याचे लेखी हमीपत्र नागरी मंत्रालयाने शिष्टमंडळाला दिले.
केंद्र शासनाच्या नागरी वाहतूक मंत्रालयाने वर्षभरापूर्वी उडान योजनेची घोषणा केली होती. छोटी शहरे मोठ्या शहरांना जोडणे हा हेतू या योजनेमागे शासनाचा आहे. या योजनेंतर्गत  नाशिकसह राज्यातील पुणे, सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर, जळगाव आदी शहरे मुंबई विमानतळाशी जोडली जाणार आहेत.
खा. हेमंत गोडसे यांनी पाठपुरावा करूनही जीव्हीके कंपनीने राज्यातील विमानतळांना मुंबईत टाईम स्लॉट नसल्याचे स्पष्ट करत नाशिकहून सुरू होणार्या विमानसेवेला खीळ घातली.  मात्र गुजरातमधील कांडला, सुरत, पोरबंदर येथील विमानतळांना ऑगस्ट महिन्यात टाईम स्लॉट उपलब्ध करून दिला.
यातूनच संतापलेल्या शिवसैनिकांनी आज थेट दिल्ली येथील नागरी वाहतूक मंत्रालयावर धडक मोर्चा काढला. मोर्चा मंत्रालयावर येताच आंदोलकांनी केंद्र सरकार आणि जीव्हीके कं पनीविरोधात घोषणाबाजी करत कार्यपद्धतीचा निषेध केला. मोर्चात खा. हेमंत गोडसे, शिवसेनेचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष निरज शेठी, उत्तर भारतीय संघाचे विनय शुक्ला, सेनेचे पंजाब  प्रदेशाध्यक्ष योगीराज शर्मा, बिहारचे कोशलेंद्र शर्मा या नेत्यांसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.