Breaking News

खड्डेमय रस्त्यांची जबाबदारी स्वीकारून महापौरांनी राजीनामा द्यावा -अमित शिंदे

सांगली, दि. 27, ऑक्टोबर - सांगली महापालिका क्षेत्र खड्डेमुक्त करण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापती यांनी आपापल्या पदाचे  राजीनामे द्यावेत, अशी मागणी सांगली जिल्हा सुधार समितीचे कार्याध्यक्ष ऍड. अमित शिंदे यांनी गुरूवारी पत्रकार बैठकीत केली. सत्ताधा-यांवर अंकुश ठेवण्यात आलेल्या अपयशाची  जबाबदारी स्वीकारून विरोधी पक्षनेत्यांनीही राजीनामा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
महापालिका क्षेत्रातील रस्ते कामावरून सांगली जिल्हा सुधार समितीच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या विविध आंदोलनाचा धसका घेऊन सत्ताधारी काँग्रेस पदाधिकारी व महापालिका  आयुक्त रविंद्र खेबूडकर यांच्यात आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर ऍड. अमित शिंदे यांनी पत्रकार बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार  बैठकीस सांगली जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण, जयंत जाधव, तानाजी रूईकर, युवराज नायकवडी, आसिफ मुजावर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
महापालिका क्षेत्रातील खड्डेमय रस्त्यांमुळे सांगलीकर कमालीचे हैराण झाले आहेत. सत्ताधारी व अधिकारी यांच्या भ्रष्ट व गलथान कारभारामुळेच रस्त्यांची ही बिकट अवस्था झालेली  आहे. सांगली जिल्हा सुधार समितीने रस्ते दुरूस्तीबाबत सुरू केलेल्या विविध अनोख्या आंदोलनाला सर्वसामान्य सांगलीकरांसह विविध सामाजिक संघटनांकडूनही जोरदार प्रतिसाद  मिळत आहे. या आंदोलनात सांगलीकरांचा वाढत असलेला सहभाग पाहून महापालिकेतील या सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.
या खड्डेमय रस्त्यांबाबत गत साडे चार वर्षे झोपलेले सत्ताधारी व अधिकारी आता खडबडून जागे झाले असून या अपयशाबाबत एकमेकांवर तोंडसुख घेत आहेत. खरोखरच महापा लिकेचे अधिकारी सत्ताधारी नेत्यांचे ऐकत नसतील, तर या अपयश व खड्डेमय रस्त्यांची जबाबदारी स्वीकारून महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापती यांनी राजीनामे द्यावेत  व महापालिका सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय काँग्रेस नेत्या जयश्री मदन पाटील यांनी घ्यावा. खड्डेमय रस्त्याला अधिका-यांसह पदाधिकारीही तितकेच जबाबदार आहेत. सत्तेत  असणा-यांना सत्ता चालविण्यात अपयश येत असल्याने व आगामी निवडणुका नजरेसमोर ठेवूनच सत्ताधारी नेते रस्त्यावर उतरण्याची नौटंकी भाषा करीत आहेत.
महापालिका क्षेत्रातील रस्त्यांसाठी मंजूर असलेले 32 कोटी रूपये गत तीन वर्षापासून कोणत्या गुहेत लपवून ठेवले आहेत, याचा आपण लवकरच भांडाङ्गोड करणार आहे. महापा लिका सभागृहात केवळ पाकिटासाठी नको त्या विषयांवर तासन तास चर्चा करणारे सदस्य रस्ते प्रश्‍नाबाबत उदासिन आहेत. वास्तविक, चांगले रस्ते करून त्यात भ्रष्टाचार होऊ नये,  यासाठी रोड रजिस्टर ठेवावे, अशी मागणी सांगली जिल्हा सुधार समिती कित्येक वर्षापासून करीत आहे. परंतु याकडे सत्ताधारी अथवा अधिकारी कोणीही लक्ष देत नाही. आता  जयश्री पाटील यांनी तरी आपल्या सदस्यांकडे या रोड रजिस्टरसाठी आग्रही भूमिका घ्यावी. अन्यथा, आगामी निवडणुकीत सांगलीकर जनता त्यांना कदापिही माफ करणार नाही.
सांगलीकरांनी आपणाला आंदोलन करण्यासाठी नव्हे, तर विकासकामे करण्यासाठी निवडून दिले आहे, याची जाणीव या नेत्यांनी ठेवावी. ज्या कामासाठी निवडून दिले आहे, तेच जर  जमत नसेल, तर पदाधिकारी म्हणून काम करण्यास आपण लायकीचे नाही, हे ओळखून जनाची नसेल, तर मनाची लाज बाळगून महापालिका सत्तेतून पायउतार व्हावे. सत्ताधारी व  अधिका-यांवर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरलेल्या विरोधी पक्षनेत्यांचाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राजीनामा द्यावा. एकूणच महापालिकेतील सत्ताधारी, विरोधक व अधिकारी या  सर्वांचाच कारभार संशयास्पद आहे. या सर्वांनीच सांगलीकरांना गृहीत धरलेले दिसते आहे. मात्र या सर्वांचा लुटीचा हा डाव सांगली जिल्हा सुधार समिती कदापिही यशस्वी होऊ देणार  नाही, असा इशाराही ऍड. अमित शिंदे यांनी दिला.