Breaking News

शेतक-यांना 30 टक्के बोनस द्या;शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

नागपूर, दि. 27, ऑक्टोबर - पावसाचा लहरीपणा, दुबार पेरणी, परतीच्या पावसाने पिकांची झालेली नासधूस आदींमुळे शेतकरी रसातळाला गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकर्यांना30 टक्के बोनस तसेच अंशत: कर्जमाफीऐवजी संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशा मागणीचे निवेदन 26 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले. 
राज्यात जाहीर झालेल्या कर्जमाफीनंतर शेतकरी संघटनांनी नव्याने सादर केलेल्या या निवेदनात नमूद केल्यानुसार खरीप हंगामाच्या पेरणीनंतर पावासाने दडी मारली. शेतकर्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यानंतर पावसाने जेमतेम हजेरी लावत पुन्हा दडी मारली. त्यानंतर परतीच्या पावसाने सोयाबीन काळी पडल्याने उत्पादन घटले. पावसाच्या लहरीपणामुळे कापसाची वाढ भरपूर झाली. त्यामानाने पात्याचे बोंडांची संख्या अत्यल्प आहे. अर्थातच कापसाचे एकरी उत्पदनात घट होणार आहे. धानाच्या बांध्या भरण्याएवढाही
पाऊस न झाल्यामुळे धानाचे पीकही रखडण्याच्या स्थितीत आहे. एकूणच, विदर्भातील शेतकरी आर्थिक संकटात आहेत. दरम्यान, कापसाचा उत्पादन खर्च 6952 .प्रति क्विंटल असताना केंद्र सरकारने4200 रु. प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला. दिवाळीसाठी शेतकर्यांनी कापूस विकला असता 3200 ते 3800 प्रति क्विंटलप्रमाणे खरेदी झाला. सोयाबीनचा उत्पादन खर्च3950 प्रति क्विंटल असताना शासनाचा हमीभाव3050 रुपये. तर खुल्या बाजारात व्यापारी 2 हजार ते 2600 रु. प्रमाणे सोयाबीनची खरेदी करत आहे. एकूणच,
निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच पीक कमी त्यातही हमीभावसुद्धा कमी, त्याहून खुल्या बाजारात शेतकर्यांची होणारी लूट बघता, शेतकरी बेजार झाला आहे. परिणामी सरकारने शेतकर्यांना 30 टक्के बोनस, संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.