Breaking News

जीएसटीचा परिणाम, दिवाळी अंक 25 टक्क्यांनी महागले

सोलापूर, दि. 17, ऑक्टोबर - जाहिराती मिळत नाहीत, प्रिटिंग परवडत नाही, नवीन वाचक नाही, वाचनाची अभिरूची बदललेली. अशा कारणांमुळे दिवाळी अंक आधीच कमी  झाले. त्यात यंदा वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटीने महाग करून ठेवले. हंस, मोहिनी, नवल या अंकाची किंमत तब्बल चारशे रुपये झाली आहे. दोनशे रुपयांचा ‘आवाज’  अडीचशे रुपयांपर्यंत गेला. त्यामुळे दिवाळीच्या झगमगाटात या अंकांचा ‘आवाज’ क्षीण झाल्याचे दिसून येते.दिवाळीच्या खुसखुशीत फराळासोबत दिवाळी अंकांची मजा काही औरच  असते. जत्रा, हा..हा..हा, मौज, श्यामसुंदर, मार्मिक या विनोदी अंकांतील व्यंगचित्रे वर्तमान स्थितीवर नेमके भाष्य करत असतात. नर्मविनोदी लेखनाने निखळ मनोरंजन होते. त्यामुळे  दिवाळी अंकांची सर्वांना आतुरता असते. परंतु ते दिवस आता गेले...आता वाचनाची अभिरूची बदलली आहे. मधल्या काळात आरोग्य, योगा, आयुर्वेद आणि ज्योतिषी या विषयांना  वाहिलेल्या अंकांना मागणी होती. परंतु त्याला अपेक्षित व्यवसाय नसल्याने त्या ई-पटलावर आल्या. त्याचे अ‍ॅप निघाले. शंभर रुपये देऊन डाऊनलोड केले, की अख्खा अंकच  मोबाइलवर येऊ लागला. परिणामी बाजारातील अंक संपला. आता जे अंक येत आहेत, ते निवृत्तांसाठी. निखळ विनोदी आणि मर्मभेदी. त्याला चांगली मागणी असल्याचे विक्रे तेसांगतात.