Breaking News

विजेची तार पडून 14 म्हशींचा मृत्यू, शेतकर्‍याचे लाखोंचे नुकसान

सोलापूर, दि. 15, ऑक्टोबर - शहरातील शांती चौकात विद्युत प्रवाह असलेली विजेची तार पडून विजेच्या धक्क्याने 14 म्हशींचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. कन्ना चौकातील दुधाचे प्रसिद्ध व्यापारी अंबा जानगवळी यांच्याकडे 20 म्हशी आहेत. त्यांचा मुलगा चंदू जानगवळी हा म्हशी चारण्यास घेऊन जात असतो. नेहमीप्रमाणे म्हशींना घेऊन तो अक्कलकोट रोडवरील पाणीची टाकी येथील हिंदू स्मशानभूमीत गेला. सायंकाळी म्हशी चरुन झाल्यानंतर त्यांना धुण्यासाठी चंदू जानगवळी त्यांना हिंदू स्मशान भूमीतील पाण्याच्या डबक्यात घेऊन गेला. म्हशी धुवून झाल्यानंतर तो डबक्याच्या बाहेर पडला. 
यावेळी त्याच्यासोबत सहा म्हशी पाण्याच्या बाहेर आल्या. त्यावेळी अचानक विद्युत प्रवाह असलेली तार तुटून डबक्यात पडल्याने14 म्हशींचा मृत्यू झाला. सुदैवाने चंदू जानगवळीसह सहा म्हशी वाचल्या आहेत. 14 म्हशीच्या मृत्यूने अंबा शंकर जानगवळी यांचे जवळपास 14 लाखाचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महापालिका आपत्कालीन विभागाचे एच. आर. मुजावर, विक्रमसिंह पाटील, पोलीस निरीक्षक गुरुदत्त माढेकर, निरीक्षक पी. एस. पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड, उपनिरीक्षक विशाल धांडेकर, विधुत मंडळाचे सहाय्यक अभियंता चोरगे, मोंजी, माळवदे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गवळी आदींनी धाव घेत मदत केली. विधुत प्रवाह बंद करुन जेसीबीच्या साहाय्याने म्हशींना बाहेर काढण्यात आले. याबाबत पंचनामा झाल्यावर घटनेबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.