Breaking News

दुर्घटनेत 14 म्हशी गमावल्या; केली 25 हजारांची मदत

सोलापूर, दि. 18, ऑक्टोबर - दिनदिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गायी म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या...हे दिवाळीतील गीत आपण लहानपणापासून ऐकतो. त्याची सुरुवातच  वसुबारसेने होते. गाई-म्हशींच्या सन्मानाच्या या सणात शहरात एक अप्रिय घटना घडली. कन्ना चौक परिसरात राहणार्‍या प्रभाकर ऊर्फ आप्पाराव जानगवळींच्या 14 म्हशी विजेचा  धक्क्याने मृत्युमुखी पडल्या. सोशल मीडियामुळे जोडल्या गेलेल्या परजिल्ह्यांतील कनवाळूंनी त्याला लगेच प्रतिसाद देत 25 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केली. 13 आ ॅक्टोबरला सायंकाळी अक्कलकोट रस्त्यावरील पद्मशाली स्मशानभूमी परिसरात ही घटना घडली होती.येथील एका खड्ड्यात या म्हशी धुतल्या जातात. नेमके त्याच दिवशी तेथील एक  विद्युत वाहक तार तुटून या पाण्यात पडली आणि या मुक्या म्हशींचा जीव गेला. त्याने जानगवळी यांच्या जीवनाचा आधारच निसटला. दिवसाकाठी एकेक म्हैस 10 ते 12 लिटर दूध  द्यायची. पण या आकस्मित घटनेमुळे जानगवळी यांची उपजीविकाच थांबली. त्याची दखल घेत सोलापूरकरांनी लगेच आपला मदतीचा हात पुढे केला. आपापल्या परीने 500 रुपये,  1000 रुपये जमा करत माणुसकी जागवली. यात सुलेखनकार अभिजित भडंगे यांच्यासह अनेकांचा सहभाग आहे. अजूनही ज्यांना मदत करावयाची आहे, त्यांनी 9011014399  या क्रमांकावर संपर्क साधावा.