Breaking News

दश दिशांनी लेवू दे आनंदाचे पैंजण.........

दि. 19, ऑक्टोबर - सर्व दूर दाटलेल्या  काळोखात चाचपडणार्या पाऊल वाटेवर चालतांना मनाला शिवणारी ठेचाळण्याची भिती काजव्यांच्या जाणीवेनेही क्षणार्धात  पळते.आयूष्याच्या वाटेवरही पसरलेलं अंधाराचं मळभ दूर करणारी प्रकाश किरणांची एखादी तिरीप आधार देऊन मनावरचा  ताण हलका करते.हे सामर्थ्य असणार्या प्रकाशाचा सण  म्हणजे दिपोत्सव.भारत वर्षाला या उत्सवाचं महत्व सांगण्याचा मोठेपणा दाखविण्याची शेखी आम्ही मुळीच मिरवणार नाही.
दिवाळी,दिपावली,प्रकाशोत्सव अशी विविध नामाभिधान धारण करून साधारण आक्टोबर नोव्हेबरच्या कालखंडात साजरा केला जाणार्या या उत्सवाला अनेक पौराणिक,ऐतिहासिक  संदर्भ आहेत.या संदर्भांविषयी मत मतांतरे असू शकतील.माञ सुगीची रेलचेल असतांना सर्वच क्षेञाला एका वेगळ्या पातळीवर नेऊन समाधान देणारा हा उत्सव आहे ,बळीराजासाठी  श्रम परिहार,कामगार कष्टकरी,नोकर वर्गासाठी व्यावसायिक व्यापार्यांसाठी खरेतर सर्वांसाठी कौटूंबिक ऐक्यासाठी वर्षातून एकदा आलेली पर्वणी असा या उत्सवाचा उल्लेख केला तर  अतिशोयोक्ती ठरू नये.
हा काळ वर म्हटल्या प्रमाणे सुगीचा.शेतीचा एक हंगाम संपून दुसरा हंगाम सुरू होण्यापूर्वीचा मधला काळ.पहिल्या हंगामातील उत्पादन बाजारात आलेले,शेतकरी वर्गाच्या हातात  मुबलक नसला तरी उत्सवाचा आनंद घेण्याइतपत पैका खेळता असतो,नोकर वर्ग,कष्टकरी मजूर या वर्गाकडे दिवाळी भेट पगार बोनस या माध्यमातून रोकड खेळती असते.
उत्सवाचे समाधान,आनंद मिळवण्याच्या हेतूने होणार्या विविध प्रकारच्या खरेदीच्या निमित्ताने ही लक्ष्मी बाजारात खेळते.आणि व्यावसायिक व्यापार्यांमध्येही सुगीचे पडसाद उमटू  लागतात.असे साधारण या प्रकाश उत्सवाचे स्वरूप.कौटूंबिक पातळीवर सासूरवाशिणीचं माहेरपण,कामधंद्यांच्या निमित्ताने वर्षभर एकमेकांपासून कोसोगणती दूर गेलेले कौटूंबीक  सदस्य सणाच्या निमित्ताने एकञ येतात,आणि बारा महिन्यांच्या नात्याच्या विरहावर फुंकर घालून स्नेह पुनरूज्जिवित करतात,हे आपल्या दिवाळी सणाचे पारंपारीक रूपडं.
साधारण वसू बारस ते ञिपुरारी पौर्णिमा हे वीस दिवस हा उत्सव साजरा करण्याची प्रथा होती.घरातील जळमट काढून मनातील कोळीष्टक काढण्यापर्यंतचे सारे उपचार करून  रंगरंगोटी,अंगणात रांगोळ्यांची सजावट ,दारासमोर आकाश कंदील,घरासभोवताली पणत्यांची आरास हे सारे लखलखणारे दृश्य या सणाचे आपल्या आयूष्यातील महत्व विषद करून  दूरितांचे तिमीर जावो जे खळांची व्यकंटी सांडो या शुभकामनांची परपस्परांच्या सर्वांगीण प्रगतीला साद घालणारे....
आज काय परिस्थिती आहे? आपली या प्रकाशोत्सवाची परंपरा कुठे हरवली आहे. वैश्‍विकीकरणाच्या प्रगतीने जागतिक भिंती कोसळून जग जवळ आलं,जगाच्या सीमा नष्ट झाल्या  त्याच वेगाने माणसाच मन माञ संकुचित झालं.ज्ञानाच्या कक्षा रूंदावल्या पण नात्यातील जिव्हाळा मंदावला.माहेरपण हरवलं,कौटूंबिक स्नेह स्वार्थाच्या कोळीष्टीकांनी कु रतडला.मी,माझ्या पलिकडे या सणाची व्याप्ती शिल्लक राहीली नाही.केवळ परंपरा आहे म्हणून दिनदर्शिकेतील बाजारू उत्सव असे निर्जिव स्वरूप या उत्सवाने धारण केले आहे.
दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी चा गोडवा हरवून दीन दीन दिवाळी,गाई म्हशी बाजारी नेण्याची वेळ आली आहे.कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतो आहे,महागाईने कष्टक री,मजूर कामगार नोकरवर्ग होरपळतोय.आकाश कंदील,पणत्यांच्या शितल प्रकाशाचं असणही वणव्यात सापडल्यागत जाणीव देणारं ठरतयं.जीवनाची मुल्यं नितीमत्तेशी फारकत घेऊ  लागलीत.बाजारातलं चैतन्य काळवंडलयं.आहे रे,नाही रे दोन्ही वर्गातील जीव नैराश्याच्या खाईत आपलं  शोधू पहाताहेत.जीवनाची परिभाषा,संबंधांची व्याख्या सारं सारं बदलयं....
सर्वदूर दाटलेल्या अंधाराचं मळभ  हावी झालयं.काळोखात चाचपडणार्या वाटेला मार्ग दाखविणारे चंद्र सुर्यच अंधाराला फितूर झालेत.ज्यांनी जग उजळायचे तेच काळोखाला शरण  गेलेत.मग प्रकाशाची तिरिप येणार तरी कुठून? अशा या खिंडीत सापडलेल्या दिवाळ सणाच्या शुभेच्छा द्यायच्या तरी काय द्यायच्या?
पण प्रथा आहे.शुभ घडीला अपशकून ठरण्याचं पातकं माथ्यावर घ्यायच नाही. म्हणूनच
लक्ष लक्ष ज्योतींचे रिंगण
सप्तरंगी रांगोळीने सजू दे अंगण
दश दिशांनी लेवू दे आनंदाचे पैंजण
आमच्या शुभेच्छांनी उजळू दे आपुले जीवन
या शुभेच्छा देऊन थांबतो.