Breaking News

काँग्रेसच्या भाजप विरोधी आघाडीत शिवसेना सहभागी होणार ?

मुंबई, दि. 27, ऑक्टोबर -भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विरोधकांची आघाडी उभारण्याचे प्रयत्न काँग्रेस च्या नेतृत्वाकडून चालू आहेत . काँग्रेसच्या आघाडीत शिवसेना सहभागी होऊ शकते , असे संकेत काँग्रेस आणि शिवसेनेच्या गोटातून देण्यात येत आहेत. 
2014 मध्ये भारतीय जनता पक्षाला केंद्रात स्वबळावर सत्ता मिळाल्यानंतर भाजप - शिवसेनेतील संबंध हळूहळू ताणत गेले. त्याची परिणती 2014 च्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षातील 25 वर्षांची युती संपुष्टात येण्यात झाली . त्यानंतर दोन्ही पक्षातील संबंध आणखी कडवं झाले . हो नाही करता शिवसेना राज्यातील सत्तेत सहभागी झाली तरी शिवसेनेने तेंव्हापासून मोदी आणि फडणवीस सरकारविरुद्ध कडवट टीका करणे सुरु केले आहे . त्याचा परिणाम या दोन्ही पक्षातले संबंध आता न सुधारण्याच्या पातळीवर येऊन पोहचले आहेत . भारतीय जनता पक्षाने आता शिवसेना नेतृत्वाची मनधरणी न करण्याचे ठरवले आहे . 2019 च्या लोकसभा निवडणुका आपल्याला स्वबळावर लढवायच्या आहेत या दृष्टीने भाजप नेतृत्वाची तयारी सुरु आहे .
शिवसेना नेतृत्वाने कितीही आव आणला तरी शिवसेनेला लोकसभा निवणुका एकट्याच्या बळावर लढवणे कठीण आहे . 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आपण मोदी लाटेमुळेच निवडून आलो याची जाणीव शिवसेनेच्या अनेक खासदारांना आहे. शिरूर लोकसभा मतदार संघाचे खा . शिवाजीराव पाटील आढळराव वगळता सेनेचा एकही खासदार शिवसेना एकट्याने लढली तर निवडून येऊ शकत नाही . अशा स्थितीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय आघाडीत सहभागी होण्यास काहीच हरकत नाही असा विचार सेना नेतृत्वाकडून सुरु आहे . काँग्रेसकडून गेल्या काही दिवसांत अशा हालचालीचालू झाल्या आहेत . काँग्रेस नेतृत्वाकडून या संदर्भात शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा चालू आहे , अशी माहिती सेनेच्या ज्येष्ठ नेत्याने दिली .
शिवसेना खा . आणि सामना या सेनेच्या मुखपत्राचे संपादक संजय राऊत यांनी कालच राहुल गांधी नरेंद्र मोदी यांना समर्थ पर्याय म्हणून पुढे येत आहेत असे वक्तव्य केले होते . शिवसेना आणि काँग्रेस ने भाजपला सत्तेतून बाजूला ठेवण्यासाठी अनेक ज़िल्हा परिषद आणि पंचायत समित्यांत आघाडी केली आहे . नुकत्याच झालेल्या नांदेड महापालिका निवडणुकीत शिवसेनेने भारतीय जनता पक्षाचा पराभव व्हावा या साठी काँग्रेसला थेट मदत केली होती .
काँग्रेस आणि शिवसेनेला एकमेकांचे कधीच वावडे नव्हते. 1977 मध्ये आणीबाणीचे समर्थन करत शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला होता . 2007 आणि 2012 च्या राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेसच्या अनुक्रमे प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता . त्यावेळी शिवसेना भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत होती, या कडे सेनेच्या या ज्येष्ठ नेत्याने लक्ष वेधले .