Breaking News

अडीच कोटींच्या बदल्यात तेरा किलो बनावट सोने देऊन फसवणूक

पुणे, दि. 22, सप्टेंबर - अडीच कोटी रुपयांच्या बदल्यात तेरा किलो बनावट सोने देऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पुणे शहरातील  खडक पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून तिघांना अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी वैभव भास्कर धामणकर (वय-36, रा.  खंडाळा, जि.सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. धीरज जाधव, अमर भोसले, संजय बर्गे यांच्यासह बँकेच्या दोन कर्मचा-यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून  तिघांना अटक केली आहे. पुणे शहरातील भवानी पेठेतील एका खाजगी बँकेत आरोपींनी 13 किलो सोने ठेवले होते. हे सोने अडीच कोटी रुपयांच्या बदल्यात  फिर्यादीला देण्याचे त्यांनी मान्य केले. त्यानुसार फिर्यादींने आरोपीच्या बँक खात्यात अडीच कोटी रुपये जमा करून सोने ताब्यात घेतले असता त्याला ते सोने  बनावट असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसांना कळवले. पोलिसांनी हे बनावट सोने जप्त केले असून पोलीस निरीक्षक राजेंद्र  मोकाशी अधिक तपास करत आहेत.