Breaking News

संरक्षण मंत्रालय व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार

नवी दिल्ली, दि. 22, सप्टेंबर - लष्करी जवानांना निवृत्तीनंतरही समाजात ताठ मानेने जगता यावे, या उद्देशाने त्यांच्यासाठी आता नोकरीच्या जागीच पदवी आणि  पदव्युत्तर पदवीच्या उच्चशिक्षणाची प्रकाशवाट खुली करून देण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने जवानांसाठी विशेष दूरशिक्षण शिक्षणक्रम  विकसित केला असून, संरक्षण मंत्रालय व मुक्त विद्यापीठ यांच्यात गुरुवारी नवी दिल्लीत सामंजस्य करार करण्यात आला. 
दिल्लीतील लष्कराच्या मुख्यालयात झालेल्या सामंजस्य करारावेळी संरक्षण मंत्रालयातर्फे लेफ्टनंट जनरल अश्‍वनी कुमार यांच्यासह मनुष्यबळ नियोजन व सुविधाचे  लेफ्टनंट जनरल आर. गोपाल आणि मनुष्यबळ सुविधाचे अतिरिक्त संचालक मेजर जनरल सुधाकर जी. यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी तर मुक्त  विद्यापीठातर्फे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे आणि विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश अतकरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन  आणि सूत्रसंचालन ब्रिगेडियर नारायणन् यांनी केले.
मुक्त विद्यापीठाच्या वतीने या खास अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली आहे. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी लाखो जवान खडा पहारा देतात. तळहातावर  शीर घेऊन ते अखंड कार्यमग्न असतात. मात्र, बहुतांश जवानांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य खडतर असते असा सर्वसाधारण अनुभव येतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे  अपुरे शिक्षण. अत्यंत तरुण वयात लष्करात दाखल झालेल्या बहुतांश जवानांना दहावी किंवा बारावीनंतर पुढील शिक्षण घेणे शक्य होत नाही. निवृत्तीनंतर त्यांच्यापैकी  अनेक जण बाहेरच्या जगात रोजगारासाठी उतरतात, तेव्हा त्यांना खासगी संस्थांतील रखवालदार वा पहारेकरी याशिवाय कोणतीही कामे मिळत नाहीत. पदवीपर्यंतचे  शिक्षण पूर्ण न करू शकणार्‍या या जवानांच्या वाट्याला निवृत्तीनंतर उपेक्षाच येते. हे चित्र बदलण्यासाठी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी पुढाकार घेतला.
उच्च शिक्षणाच्या प्रकाशवाटांवर चालण्याची सुविधा लष्करी जवानांना मिळाला पाहिजे, या दृष्टीने मुक्त विद्यापीठाने खास लष्करी दूरशिक्षण शिक्षणक्रमाची रचना केली  आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पसरलेल्या लष्कराच्या तिन्ही दलांच्या तळांवरील जवानांना या अभ्यासक्रमाची माहिती कळविण्याची व्यवस्था करण्यात येईल.  यासाठी लष्कराची राज्यातील सर्व प्रमुख केंद्रे मुक्त विद्यापीठाची अभ्यासकेंद्रे म्हणून ओळखली जाणार आहेत. सेवेतील जवानांच्या सोयीसाठी ’मागणीनुसार परीक्षा’  (ऑन डिमांड एक्झामिनेशन) या नाविन्यपूर्ण संकल्पनेचा समावेश या शिक्षणक्रमासाठी प्रथमच करण्यात आला आहे. त्यानुसार जवानांना स्वतःच्या सोयीनुसार परीक्षा  कालावधी निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.