अकोल्यात मुसळधार; रस्ते खचले
भंडारदरा - निळवंडे धरणातून विसर्ग वाढवला, पिकांचे नूकसान
अकोले, दि. 21, सप्टेंबर - मुसळधार पावसामुळे अकोले तालुक्याच्या पूर्व भागात काल मंगळवारी सलग दुसर्या दिवशी सायंकाळच्या सुमारास सुमारे मुसळधार पावसाने सर्वांची दाणादाण उडविली. त्यामुळे रस्त्यावर व शेतात पाणीच पाणी साचले होते. बाजरी, फ्लॉवर, कांदा रोपांची तसेच ऊसाचे या पावसामुळे नुकसान झाले आहे. अकोले शहर व परिसरात सोमवारी व मंगळवारी सलग दोन दिवस सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास पावसाच्या दोन ते तीन जोरदार सरी कोसळल्या.शहरात बर्याच ठिकाणी पावसाचे पाण्याचे तळे साठले होते. तसेच कोल्हार घोटी मार्गावर पाणीच पाणी झाले. कळस खुर्द व बुद्रुक, कुंभेफळ, सुगाव खुर्द व बुद्रुक, रेडे, तांभोळ, देवठान, समशेरपूर, सावरगाव, विरगाव, गणोरे, डोंगरगाव, हिवरगाव, पिंपळगाव, वाशेरे, मनोहरपूर, परखतपूर, औरंगपूर, इंंदोरी, रुंभोडी, मेेंहेेदुरी, गर्दनी, टाकळी, उंचखडक खुर्द व बुुुदृक येेेथे पावसाच्या कमी अधिक प्रमाणात सरी कोसळल्या. या पावसामुळे सातारा, कळस आदी डोंगरावरून पाण्याचे छोटे धबधबे वाहतांना दिसत होते. शेतकर्यांची अचानक आलेल्या पावसाने तारांबळ उडाली. अनेकांच्या शेतात उभ्या असणार्या बाजरीचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले. फ्लॉवर, नवीन टाकलेले कांद्याचे रोपे यांनाही या पावसाने झोडपले. तालुक्यातील पूर्व भागातील ऊस शेतीचेही या पावसाने नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतात उभे असणारे ऊस आडवे झाले. समशेरपूर परिसरात गेल्या आठवडा भरापासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत असल्यामुळे रस्त्यावर व शेतात पाणीच पाणी दिसत आहेत. आढळा विभागातील समशेरपूर- मुथाळणे रस्त्यावरील सोनारआळा व अनेक छोट्या ओढ्यांना चार दिवसां पासून पाणी आल्यामुळे ठिकाण चे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.
त्याचप्रमाणे थोतकडा बंधारा फुटल्याने मंदार बेनके, वसंत दराडे, भरत जोरवर, काळू बेनके, मारूती मंडलिक, प्रभाकर मंडलिक, निवृत्ती बेनके, निवृत्ती जोरवर यांच्या शेतजमिन वाहुन गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.
भंडारदरा वार्ताहराने कळविले की, भंडारदरा पाणलोटात पावसाचा जोर वाढला असून पाण्याची आवक होत असल्याने निळवंडे धरण पूर्ण क्षमतेचे (8320 दलघफू) भरले आहे. हे धरण दुसर्यांदा ओव्हफ्लो झाले असून 17000 क्युसेकने प्रवरा नदीत पाणी झेपावत आहे. सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. या पावसाची नोंद 30 मिमी झाली. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरुच होता. हरिश्चंद्र गड पायथ्याशी मुसळधार पाऊस झाल्याने मुळा नदीतील विसर्ग वाढला असून मुळा धरणातही नवीन पाण्याची आवक होत आहे. 26 हजार क्षमतेच्या या धरणातील पाणीसाठा 92 टक्क्यांच्या आसपास पोहचला होता. दरम्यान, नगर जिल्ह्यात सरासरी 124 टक्के पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी केवळ 95 टक्के पाऊस झाला होता.
इंदोरी वार्ताहाराने कळविले की, अकोले तालुक्यातील इंदोरी परिसरात मंगळवारी रात्री 6 ते बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत पडलेल्या पावसाने इंदोरी, रुंभोडी, आंबड, औरंगपूर परिसरातील बागायतदारांच्या विहीरींची संपुर्ण एका वर्षाची चिंताच एका रात्रीच्या पावसाने हटविली आहे. परिसरातील विहीरांना वरदान ठरणारा आंबड येथील पाझर तलावही भरण्याच्या मार्गावर असल्याने पुन्हा एकदा पाण्याची पातळी फुल्ल होणार आहे.