Breaking News

दांडेकर वक्तृत्व स्पर्धा उत्साहात; सत्यजा सोनवणे, कपिल देशमुख, क्षितिज भागवत प्रथम

अकोले, दि. 21, सप्टेंबर - जीवदया प्रतिष्ठान निंब्रळ व मराठी अध्यापक मंडळाच्या वतीने मंगळवारी घेण्यात आलेल्या गो. नी. दांडेकर स्मृती तालुकास्तरीय  वक्तृत्व स्पर्धेत 5 वी ते 7 वी गटात सत्यजा सोनवणे, 8 वी ते 10 गटात कपिल देशमुख व उच्च माध्यमिक गटात क्षितिज भागवत यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.
दिवंगत वृक्षप्रेमी भाउराव आवारी गुरुजी यांच्याकडून वृक्ष लागवडीची प्रेरणा घेवून स्थापन झालेल्या जीवदया प्रतिष्ठाणने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून  अकोले शहरामध्ये गेल्या सात वर्षापासून अकोले तालुका मराठी अध्यापक मंडळाच्या सहकार्याने स्व. गो. नी. दांडेकर स्मृती पित्यर्थ तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा  पॉलिटेक्नीकच्या सभागृहामध्ये पार पडली. तीन गटामध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत 5 वी ते 7 वी गटात द्वितीय क्रमांक अवंतिनी नवले, तृतीय क्रमांक ॠतुजा  डगळे व उत्तेजणार्थ सार्थक कोटकर व पुजा डगळे यांनी यश संपादन केले. तर इयत्ता 8 वी ते 10 गटामध्ये द्वितीय क्रमांक मेधज वाकचौरे, तृतीय क्रमांक सांस्कृती  शिंदे व उत्तेजणार्थ रचना कानवडे, निखिल रंधे यांनी पटकविला. तर तिसर्‍या 11 वी व 12 वीच्या गटात द्वितीय क्रमांक प्राची बांबेरे, तृतीय कांचन बेणके,  उत्तेजणार्थ सुविधा कोटकर व प्रफुल्ल शिंगाडे यांनी बक्षिसे मिळविले. 120 विद्यार्थ्यांच्या सहभागाने या स्पर्धा उत्साहात पार पडल्या असून निकोप परिक्षण ही या  स्पर्धेचे गेली सात वर्ष वैशिष्ट ठरले आहे. उद्घाटन कार्यक्रमात प्रा. बी.एम. महाले यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले. वक्तृत्व कला स्पर्धाही जगातील प्रभावी कला  आहे. वक्त्याकडे शब्द भांडार असावे व वक्तृत्व हे अस्त्र, शस्त्र व शास्त्र आहे. याची जाणीव ठेवावी.
जे.डी. आंबरे पाटील यांनी वक्तृत्वाने माणसे जिंकता येतात. मात्र विचाराप्रमाणे आचार आवश्यक असल्याचे ते म्हणाले. समारोप प्रसंगी प्राचार्य टी. एन. कानवडे  म्हणाले की, टीव्ही व तंत्रज्ञानाच्या प्रभाव असतानाही विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होवून आपली कला व्यक्त करतात ही बाब या स्पर्धेचे यश आहे. स्पर्धकांनी  भरपूर वाचन करावे. भविष्यकाळ चांगला असून काही तरी करुन दाखविण्याची वृत्ती ठेवावी. यावेळी परीक्षकांच्या वतीने मालपाणी विद्यालयाचे शिक्षक दर्शन जोशी व  तिन्ही गटात प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
यशवंतराव आभाळे म्हणाले की, वक्तृत्व स्पर्धेतून राज्याला दिशा देणारे वक्ते तयार होतील. चांगला वक्ता घडवा सुसंस्कृत पिढी घडावी हा या स्पर्धेचा उदेश आहे.  मोबाईल संस्कार व संस्कृतीचा र्‍हास होत असून त्याचा वापर कमी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी प्राचार्य ए. पी. शिंदे, आयटीआयचे प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, मराठी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष बी. के. बनकर, सचिव दिपक पाचपुते, जीवदयाचे अध्यक्ष  विठोबा वाळके, गंगाधर नलावडे, संस्थापक अध्यक्ष रवींद्र आभाळे यांनी व इतर सदस्यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन शिक्षिका अलका मंडलिक यांनी केले तर  आभार आदिनाथ सुतार यांनी मानले.