Breaking News

तांबड्या मातीने रस्त्याची मलमपट्टी!

अहमदनगर, दि. 21, सप्टेंबर - तालुक्यातील सतत वर्दळीच असलेल्या नगर-दौंड रस्त्याची चक्क तांबडी माती वापरून डागडुजी करण्याचा पराक्रम सार्वजनिक  बांधकाम खात्याने केला आहे. या पराक्रमामुळे या खात्याची सर्वत्र ’छि थू’ होत असून वाहन चालकांमध्ये या विभागाच्या अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांना सध्या  चांगलीच शिव्यांची लाखोली वाहिली जात आहे. या विभागाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष झाल्याने संताप व्यक्त होत आहे. 
नगर-दौड हा रस्ता 70 किलोमीटर अतंराचा असून तालुक्यासाठी हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे. हाच रस्ता पुढे दौंड बारामती, सोलापूर कडे जात असून या  रस्त्याची मोठी दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता व्हावा म्हणून तालुक्यात मोठे राजकारण झाले होते. संपूर्ण रस्ता अरुंद होऊन रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे  वाहन चालकांना या रस्त्यावर मोठी कसरत करावी लागते. समोरासमोर वाहन आल्यावर रस्त्याच्या खाली गाडी कोणी घ्यायची, यावरुनही वाद होतात. रात्रीच्या वेळी  झालेल्या अपघातांमध्ये आतापर्यंत किमान 60 ते 70 लोकांचा बळी गेला आहे.