Breaking News

नवरात्रोत्सवानिमित्ताने सजली जिल्ह्यातील देवी मंदिरे

अहमदनगर, दि. 21, सप्टेंबर - नवरात्रोत्सवानिमित्ताने जिल्हयातील प्रसिध्द देवींच्या मंदीरामध्ये सजावट करण्यात आली असून, नऊ दिवस विविध धार्मिक  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पाथर्डी / प्रसिध्द मोहटा देवस्थानचे नवरात्रोत्सवासाठी तयारी करण्यात आली असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन  करण्यात आले आहे. अष्टमी होमापर्यंत घटी बसणार्‍या हजारो महिला राज्याच्या विविध भागातून मोहटा गडावर दाखल झाल्या आहेत. आज सकाळी 11 वाजता  जिल्हा न्यायाधिश तथा देवस्थान समितलीचे अध्यक्ष सुवर्णा केवले यांच्या हस्ते घटस्थापना होईल.
आगळंवेगळं शक्तिस्थळ ः राहता - राहाता तालुक्यातील कोल्हार-भगवतीपूर हे पवित्र प्रवरा नदीच्या तीरावर वसलेलं  आहे. एक व्यापारीपेठ म्हणून जितका  कोल्हारचा नावलौकिक आहे तितकंच एक आध्यात्मिक केंद्र म्हणून सुद्धा कोल्हार-भगवतीपूर हे गाव सर्वदूर महाराष्ट्रात आता माहीत झालं आहे, ते केवळ इथल्या  ग्रामदैवत भगवतीमातेमुळे! एक आगळंवेगळं शक्तिस्थळ म्हणून हे ग्रामदैवत केवळ महाराष्ट्रात नव्हे तर देशातही नावारूपाला येत आहे.
एकाच ठिकाणी या साडेतीन शक्तिपीठांचं एकत्रित दर्शन केवळ कोल्हार-भगवतीपूर या गावात होतं आणि यामुळे येणारे भाविक मातेच्या दर्शनाने धन्य होतात.इथे  भगवती मातेचं पुरातनकालिन मंदिर आहे. या मंदिराला प्राचीन इतिहास आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराचं जुनं बांधकाम हेमाडपंथी पद्धतीचं होतं. मंदिराच्या  जीर्णोद्धार कार्यात जमिनीच्या समतलापासून 40-45 फूट खोलवर खोदकाम होऊनही मंदिराचा पाया दृष्टीस पडला नाही तसंच मंदिरनिर्मिती संदर्भातील  शिलालेखसदृश्य अन्य पुरावाही सापडला नाही. त्यामुळे मंदिर अनादीकाळातील असल्याची साक्ष पटते.
प्राचीनकाळी प्रवरा परिसर म्हणजे एक प्रकारचं दंडकारण्य होतं. श्रीराम वनवासात असताना या भूमीवर त्यांनी पूजेसाठी वाळूची पिंडी तयार केली. या ठिकाणी त्यांना  श्री महादेव प्रसन्न झाले. पुढे याच ठिकाणी मंदिर बांधण्यात आलं. त्या मंदिरास कोल्हाळेश्‍वर नाव पडलं. कोल्हाळेश्‍वर वरून या गावास ‘कोल्हार’ नाव पडलं असं  काहीजण मानतात.
सध्या, कोल्हाळेश्‍वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे.
ग्रामदेवतेविषयी एक आख्यायिकाही प्रसिद्ध आहे. कोल्हार गावात फार वर्षांपूर्वी लोटांगण बाबा नावाचे गृहस्थ राहत होते. दरवर्षी ते वणीच्या गडावर सप्तश्रुंगीमातेच्या  दर्शनाला कोल्हार-भगवतीपुरातून अक्षरशः लोटांगण घालत जात. पुढे त्यांना वयोमानानुसार वणीला लोटांगण घालत जाऊन देवीचं दर्शन घेणं अशक्य झालं. तेव्हा  सप्तश्रुंगी गडावरील अंबामातेने त्यांना दृष्टांत दिला की, मीच दरवर्षी पौष पोर्णिमा ते माघ पौर्णिमा या काळात कोल्हार इथे येईन आणि दर्शन देईन. तेव्हापासून दरवर्षी  पौष शुद्ध पौर्णिमा ते माघ शुद्ध पौर्णिमा असा महिनाभर इथे महोत्सव साजरा केला जातो. महिनाभर यात्रोत्सव चालणारं हे भारतातील एकमेव जागृत तीर्थक्षेत्र आहे.
अश्‍विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी म्हणजेच घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. भगवतीमाता मंदिर आणि परिसरात  नेत्रदीपक रोषणाई केली जाते. नऊ दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मंदिरात संपन्न होतात.
नेवासा - शहरातील मुख्य बाजारपेठेत दुर्गादेवीचे आकर्षक असे मंदिर आहे या मंदिरात व्यापारी व नागरिक रोज नित्यनियमाने दर्शनासाठी येत असतात.भाविकांची  मनोकामना पूर्ण करणारी जागृत दुर्गादेवी म्हणून या देवालायची ख्याती आहे.या मंदिरामध्ये नवरात्री मध्ये शहरातील महिला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी  असते.साक्षात्काराची प्रचिती देणारी दुगादेवी अशी या स्थानाची महती आहे
दुर्गादेवी मातेचे हे मंदिर पुरातन असून जिर्णोद्धारा अगोदर येथे चुना मातीचे मंदिर होते या मंदिरात तुळजापूरची भवानी,रेणुका माता,चौंडाळयाची माता, अशी जुनी  ठाणी आहेत,मंदिर जिर्णोद्धारासाठी मंदिर ट्रस्ट करण्यात आले.मंदिर ट्रस्टचे तत्कालीन पूर्वअध्यक्षांनी अहोरात्र कष्ट करून मंदिर उभारणीसाठी निधी गोळा केला  त्यानंतर येथे दगडी शिल्पकलेचे दुर्गादेवी मंदिर उभारण्यात आले.
मंदिरावरील शिखराचे काम पूर्ण झाल्यावर गुरुवर्य भास्करगिरी महाराज, महंत सुनीलगिरी महाराज, ह. भ. प.  उद्धवमहाराज, यांचे हस्ते कलशारोहन करण्यात आले.
या मंदिरामध्ये आदिमाया शक्ती दुर्गादेवीची प्राणप्रतिष्ठा 1982 साली वेदमंत्राच्या जयघोषात करण्यात आली. दुर्गादेवीच्या मूर्ती शेजारीच पुरातन तुळजापूरची भवानी  माता यांची स्थापना करण्यात आली तसेच मंदिरात गणरायाची जागृत मूर्ती असून विठ्ठल-रुक्मिणी, हनुमान,महादेवाची पिंड यांची ही स्थापना करण्यात आली.
मंदिरात मध्ये दर  सोमवारी  व गुरूवारी श्री स्वामी  समर्थ  अध्यात्मिक केंद्र सुरु झाले, गेल्या तीन पिढ्यापासून देवीचे पुजारी कै. एकनाथराव चव्हाण व कुटुंब या  मंदिराची देखभाल व पूजापाठ परंपरेनुसार  करतात. शेवगांव - शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथील  रेणुका माऊलीचा नवरात्र महोत्सव मोठ्या थाटामाटात  साजरा होत आहे व याची तयारी रेणुकामाता माऊली चे मंदिर रोषणाईने उजळले आहे. देवस्थानातील श्री रेणुका माता मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई  करण्यात आली असून श्री क्षेत्र माहूर येथून तब्बल 450 किलो मीटर अंतरावरून भाविकांनी आणलेल्या पायी ज्योतीचे बुधवारी शेवगावच्या मुख्य मार्गावरून मिरवणूक  काढून तसेच अमरापूर येथील देवस्थानात प्रशांत भालेराव व त्यांच्या धर्म पत्नी सौ. जयंती यांच्या हस्ते ज्योतीचे पूजन करून जल्लोषात स्वागत करण्यात आले.  अमरापूर येथे होणा-या घटस्थापने साठी श्री क्षेत्र माहूर येथून पायी ज्योत आणली जाते.