Breaking News

गणपती विसर्जन मिरवणूकांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवावी : पालकमंत्री

बुलडाणा, दि. 03, सप्टेंबर - जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सव काळात सर्वात महत्वाचा दिवस विसर्जनाचा असतो.  गणेश विसर्जन मिरवणूकांमध्ये कायदा व सुव्यवस्था पाहावी. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घ्यावी. शांततेने मिरवणूका पार पाडण्यासाठी  यंत्रणांनी सज्ज रहावे,  अशा सूचना राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज केल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कायदा व सुव्यव्यवस्थेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा  घेताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी  षण्मुखराज, अप्पर पोलीस अधिक्षक संदीप डोईफोडे, श्याम घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी ललीत वराडे आदींसह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.
गणेश विसर्जन मिरवणूक मार्गांवर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचे आदेश देत पालकमंत्री म्हणाले, शांतता भंग करणार्‍या समाज विघातक घटकांना मिरवणूकीमुधून   त्वरित बाहेर काढून कारवाई करावी. कुठेही मिरवणूकीला गालबोट लागेल असे वातावरण तयार होणार नाही, याची काळजी घ्यावी.
जिल्ह्यात 924 सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये शहरी भागात 370 व ग्रामीण भागात 554 मंडळे आहेत. त्यापैकी एक गाव एक  गणपती मोहिमेत 251 गावांमध्ये गणेश मंडळ आहेत. जिल्ह्यात एकूण 33 पोलीस स्टेशन असून जवळपास 5 तारखेला शहरी भागात 337 व गा्रमीण भागात 493  गणेश मंडळांचे विसर्जन होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीला पोलीस विभाग, पशुसंवर्धन, नगर पालिका प्रशासन या विभागांचे अधिकारी  उपस्थित होते.