Breaking News

भातशेतीमध्ये पॅडी आर्टच्या माध्यमातून साकारला काळा बिबट्या

पुणे, दि. 21, सप्टेंबर - सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यातील फुलांच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले पुण्यातील हौशी वनस्पतीशास्त्रज्ञ श्रीकांत इंगळहळीकर यांच्या  प्रयत्नांतून सिंहगड रस्त्यावरील डोणजे फाटा येथे सलग दुसर्‍या वर्षी पॅडी आर्ट साकारले आहे. पॅडी आर्ट अर्थात भातशेतीच्या माध्यमातून भव्य चित्र साकारण्याचे हे  इंगळहळीकर यांचे सलग दुसरे वर्ष असून यावर्षी त्यांनी काळा बिबट्या साकारला आहे. 
व्यवसायाने उद्योजक असलेल्या इंगळहळीकर यांनी जपानमधील हे पॅडी आर्ट’ प्रथमच पुण्यात आणले. दक्षिण जपानमधील ओमोरी जिल्ह्यात असलेले इनाकादाते या  गावात पॅडी आर्ट चा जन्म झाला. मागील वर्षी त्यांनी यातूनच साकारलेला गणपती पुणेकरांसाठी आकर्षण ठरला होता. पॅडी आर्ट साकारताना जमिनीचा एका  ’कॅन्व्हास’सारखा वापर केला जातो आणि विविध रंगातील भाताची रोपे लावून रंगसंगती साधली जाते. जोराच्या पावसात गुडघाभर पाण्यात उभे राहून दोन रंगांच्या  भातपिकाची पेरणी करणे हे आव्हानात्मक काम असल्याचे इंगळहळीकर यांनी नमूद केले. मागील वर्षी सिंहगड रस्त्यावरील डोणजे फाटा येथे लेक्सॉन विंडर्स या  कंपनीच्या आवारात गणपती साकारला होता. या वर्षी त्यांनी ब्लॅक पॅन्थर अर्थात काळा बिबट्या साकारला असून चित्राचा आकार 120बाय 80 फूट एवढा आहे.  पर्यटकांसाठी ते एक आकर्षण ठरते आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत हे पॅडी आर्ट पाहता येणार आहे.