Breaking News

खर्डा येथील परीक्षाकेंद्रावर शिवीगाळ करून मारहाण

बारावीचा पेपर सुरू असताना जामखेड तालुक्यातील खर्डा येथिल न्यू इंग्लिश स्कूल येथील परीक्षा केंद्रातील वर्गात परीक्षा सुरू असताना आरोपी अवी मोहन सुरवसे हा घुसला. यावेळी केंद्रसंचालक श्रीराम मुरुमकर यांनी त्यास अडवले असता, त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी आरोपी विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


जामखेड तालुक्यातील खर्डा येथिल न्यू इंग्लिश स्कूल या परीक्षा केंद्रावर दि. 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.15 वा. 12 वीचा राज्यशास्त्र विषयाचा पेपर चालू असताना फिर्यादी केंद्रसंचालक श्रीराम सदाशिव मुरुमकर ड्युटीवर होते. यावेळी आरोपी अवी मोहन सुरवसे हा त्याच्या बुलेट गाडी क्रमांक एम. एच. 12 पी. यु. 111 या गाडीवर शाळेत आला. 12 वीचा पेपर सुरू असलेल्या दुसर्‍या मजल्यावरील वर्गात घुसत असताना फिर्यादी केंद्रसंचालक श्रीराम सदाशिव मुरुमकर यांनी त्यास अडवले असता आरोपी सुरवसे याने शिवीगाळ व दमदाटी करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणला. यावेळी शाळेतील शिक्षक जमा झाले असता मी तुम्हाला बघून घेतो म्हणून निघून गेला.
याबाबत फिर्यादीस 10 वी व 12 वीचे पेपर व संस्था मिटींग असल्याने गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला. यामुळे दि. 8 मार्च रोजी फिर्यादी केंद्रसंचालक श्रीराम सदाशिव मुरुमकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अवी मोहन सुरवसे यांच्या विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.