Breaking News

लेखी आश्‍वासनानंतर शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे उपोषण मागे

पुणे, दि. 21, सप्टेंबर - शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील बंदी उठवावी, तसेच अन्य मागण्यांसाठी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले राज्यातील शिक्षकेतर  कर्मचार्‍यांचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे. माध्यमिक शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी दिलेल्या लेखी आश्‍वासनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 
गेल्या 14 वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचार्‍यांची भरती बंद, सुमारे 32 हजार शिक्षकेतर कर्मचार्‍यांची पदे रिक्त आहेत. जवळपास 40 टक्के माध्यमिक शाळांत लेखनिक,  प्रयोगशाळा परिचर, ग्रंथपाल, शिपाई अशी पदे रिक्त आहेत. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी शिक्षण आयुक्त  कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.
या आंदोलनाला शिक्षक आमदारांसह शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला होता. शिक्षण विभागाकडून लेखी आश्‍वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा  कर्मचार्‍यांनी घेतला आहे. अखेर बुधवारी संचालक म्हमाणे यांनी कर्मचार्‍यांशी चर्चा केली. यावेळी म्हमाणे यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन त्यांना लेखी आश्‍वासन  सुपूर्त केल्यानंतर 16 कर्मचार्‍यांनी केलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले.
शिक्षणमंत्र्यांनी फोनवर दिलेल्या आश्‍वासनानुसार शिक्षण संचालकांनी शिक्षकेतरांचे प्रश्‍न सोडविण्याचे लेखी आश्‍वासन दिले आहे. त्यामुळेच आम्ही अखेर हे उपोषण  थांबविले आहे. मात्र पुढील एक महिन्यात जर हा प्रश्‍न सोडवला नाही गेला तर हे आंदोलन अधिक तीव्र स्वरुपाचे करण्यात येईल - शिवाजी खांडेकर, सरकार्यवाह  माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळ