Breaking News

मराठवाडा जीवनगौरव पुरस्कार राजेंद्र कोरे यांना जाहीर

पुणे, दि. 22, सप्टेंबर - मराठवाडा मुक्ती मंचतर्फे देण्यात येणारा मराठवाडा जीवनगौरव पुरस्कार वास्तुविशारद राजेंद्र कोरे यांना जाहीर झाला आहे. राजेंद्र कोरे  यांची निवेदक, कवी, लेखक अशी विविधांगी ओळख आहे.मराठवाडा मुक्ती मंचाचा पाचवा वर्धापन दिन रविवार (दि. 24) रोजी चिंचवड येथील कै. रामकृष्ण मोरे  सभागृहात सायंकाळी पाच वाजता होणार आहे. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर उपस्थित राहणार आहेत. तसेच  अप्पर आयुक्त सुरेंद्र मानकोसकर, भारतीय रेल्वेचे विभागीय वित्त आयुक्त संतोष परगे, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते, सहाय्यक आयुक्त संग्राम  जमालपुरे, रणजीपटू प्रसाद कानडे, रोहिदास म्हस्के, जीवनधर शहरकर, विलास बडे आदी उपस्थित राहणार आहेत.वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आर्किटेक्ट राजेंद्र  कोरे यांना भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर व उपस्थितांच्या हस्ते जीवनगौरव प्रदान करण्यात येणार आहे. तसेच यावेळी मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त  इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे.पिंपरी चिंचवड शहरात राहणा-या मूळ मराठवाड्यातील लोकांसाठी  मराठवाडा मुक्ती मंच कार्यरत आहे. मराठवाड्यातील रहिवाशांना एकत्र करून त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी मंच कार्यरत  असून मंचातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम, महिला आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, मराठवाड्यात जाऊन वृक्षारोपण करणे, नचिकेत बालग्राम संस्थेस मदत व विद्यार्थ्यांना  वेळोवेळी मार्गदर्शन असे कार्यक्रम हाती घेतले जातात.