Breaking News

पिंपरी पालिकेच्या करसंकलन प्रणालीचा अवलंब उ.प्र.मध्ये करू : शिवशंकर सिंग

पुणे, दि. 22, सप्टेंबर - पिंपरी-चिंचवड महापालिकेची करसंकलन प्रणाली उत्तम प्रकारची आहे. त्याचा अवलंब उत्तरप्रदेश मधील महापालिकांमध्ये करण्यासाठी  उपयुक्त ठरणार असल्याचे, मत उत्तर प्रदेश सरकारच्या नगरपालिका वित्तीय संसाधन विकास बोर्डाचे सदस्य व सेवानिवृत्त सनदी अधिकारी शिवशंकर सिंग यांनी  व्यक्त केले.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन, पाा व वित्त व्यवस्थापनाची माहिती घेण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारच्या तीन सदस्यीय शिष्टमंडळाने आयुक्त  श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन माहिती घेतली. यावेळी ते बोलत होते. आयुक्त दालनात झालेल्या या बैठकीला सहआयुक्त दिलीप गावडे यांनी करसंकलन विभागाचे  सादरीकरण करून या पथकाला माहिती दिली.
मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी महापालिका अंदाजपत्रक व तरतूदी विषयी सादरीकरण केले. तर, कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांनी पाणीपुरवठा विभागाचे  सादरीकरण केले. मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण यांनी ई-गव्हर्नस व सारथी प्रकल्पाचे सादरीकरण केले. त्यानंतर सारथी प्रकल्पाची  नागरीकांच्यासाठी उपयुक्तता असून असा प्रकल्प पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरु केल्याबद्दल त्यांनी प्रशंसोद्गार काढले. तसेच उत्तर प्रदेश सरकारमध्येही याची  माहिती देण्यात येणार असल्याचे सिंग म्हणाले.या पथकामध्ये उत्तरप्रदेश सरकारच्या नगरपालिका वित्तीय संसाधन विकास मंडळाचे सदस्य निवृत्त सनदी अधिकारी  शंकर सिंग, कृष्ण गोपाल यांचा समावेश होता. यावेळी सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत आदी उपस्थित होते. या पथकाने सारथी, निगडी येथील सेंक्टर  23 जलशुद्धीकरण केंद्रातील स्काडा प्रणालीची माहिती जाणून घेतली.