Breaking News

सांगली : ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर

सांगली, दि. 22, सप्टेंबर - ज्या ग्रामपंचायतींची नोव्हेंबर व डिसेंबर 2017 मध्ये मुदत संपणार्‍या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील  453 ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. या निवडणुकीसाठी मतदान सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर 2017 रोजी तर मतमोजणी 17 ऑक्टोबर 2017 रोजी होणार  आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील 38, कडेगाव 43, तासगाव 26, कवठेमहांकाळ 29, जत 81, खानापूर 46, आटपाडी 26, पलूस 16,  वाळवा 88 व शिराळा तालुक्यातील 60 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 
निवडणूक प्रक्रिया 22 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणामध्ये होणे आवश्यक असल्याने राज्य निवडणूक आयोगाने  आदर्श आचारसंहिताविषयक निर्गमित केलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे निर्देश दिले आहेत. या निवडणुकीमध्ये आदर्श आचारसंहिता  पाळण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वांची माहिती या लेखात दिली आहे.