Breaking News

अंगणवाडी कर्मचार्‍यांचा 27 सप्टेंबरला मुंबईत मोर्चा

नाशिक, दि. 22, सप्टेंबर - अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या राज्यव्यापी संपावर भूमिका घेऊन महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मानधनवाढीच्या  मागणीला नकार दिला असून वर्षभरापूर्वी झालेल्या चर्चेतील निर्णयांबाबत घुमजाव केले आहे. त्यामुळे 27 सप्टेंबरला मुंबई येथे अंगणवाडी कर्मचार्‍यांचा मोर्चा  काढण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे कृती समितीतर्फे सांगण्यात आले. 
महिला व बालकविकास विभागाच्या सर्व योजना राबविण्यात महत्त्वाची भूमीका असणार्‍या अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत असंवदेनशील सरकारचा निषेध करत  हा संप आणखी तीव्र करण्याचा निर्णय कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा फिसकटल्यानंतर कृती  समितीची बैठक झाली.
बैठकीत मानधनवाढीबाबत समाधानकारक व सन्माननीय तोडगा निघेपर्यंत संप मागे न घेण्याच्या निर्णयाबबरोबरच सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन उग्र करणे, सर्व पक्षांच्या  नेत्यांना भेटी देऊन त्यांचा पाठिंबा मिळवणे, मुंबईत शक्तिप्रदर्शन करणे आदी निर्णय घेण्यात आले.
उद्धव ठाकरेंचा पाठिंबा
अंगणवाडी कृती समितीच्या सदस्यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी अंगणवाडी कृती समितीचे प्रतिनिधी एम ए पाटील, शुभा  शमीम, दिलीप उटाणे, भगवानराव देशमुख,कमल परुळेकर, सुवर्णा तळेकर, जयश्री पाटील आदी उपस्थित होते. ठाकरे यांनी शिवसेना संपाला रस्त्यावर उतरून  पाठिंबा देईल, असे आश्‍वासन दिले.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून मानधनवाढीबाबत समाधानकारक तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेऊ असे  सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी 27 सप्टेंबरच्या आंदोलनात आझाद मैदानावर कृती समितीच्या मंचावर उपस्थित राहून पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले  आहे.